>> योगेश काटे, नांदेड
भारतीय जनमानसात विविध स्तोत्र प्रसिद्ध आहेत. पण, चिरकाल स्थिर झालेली स्त्रोत्रे फार मोजकी आहे. त्यात विष्णुसहस्रनाम, रामरक्षा ,अर्थवशीर्ष, दुर्गाकवच व शिवमहिम्नस्तोत्र यांचा समावेश करावा लागेल. यात महिम्नस्तोत्राचे स्थान आगळे वेगळे आहे. शिखरिणी, हरिणी, मालिनी वृत्तांत गुंफलेले हे प्रासादिक शिवस्तोत्र आसेतुहिमाचल परंपरेने आजही तेवढ्याच श्रध्देने आबालवृद्ध, राव रंक इ सर्व.स्तरातुन आजही तेवढ्याच श्रध्देने म्हणले जाते.
संस्कृत साहित्यात शिवमहिम्न या स्तोत्राचे वर्णन गहन तत्वप्रतिपादक असे केले आहे. या अशा स्तोत्राचा कर्ता गंधर्वराज पुष्पदंत राजाविषयी आपण थोडे जाणुन घेणार आहोत. शिवमहिम्नस्तोत्राचा रचयिता कुसुमदशन अर्थात सर्व गंधर्वांचा राजा पुष्पदंत हा होता. भगवान् आशुतोष ( शंकर ) यांच्या गणात पुष्पदंत नावाचा एक खुप आवडता गण होता. तो शिव पार्वतीच्या सेवेमध्ये तत्पर असे. एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे महिम्नस्तोत्राचा उगम झाला. ती घटना अशी-
देवी पार्वती व भगवान् आशुतोष यांचा संवाद नेहमी होत असे. मात्र त्या दिवशी देवी अपर्णेने अनेक कथा ऐकल्या व म्हणाल्या आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेली कथा मला सांगवी. भगवान् आशुतोष म्हणाले, 'हो सांगतो, मात्र ही कथा सांगताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीस दारावर पाहारा देण्यास सांगतो व आतामध्ये कोणालाही सोडू नकोस अशी तंबी देतो.
थोड्या वेळाने गंधर्वराज पुष्पदंत तिथे पुजेसाठी आले. मात्र नंदी महाराजांनी त्यांना अडवले. आतमध्ये काय विशेष चर्चा चालू असेल या उत्सुतेपोटी पुष्पदंताने त्याच्याजवळ असलेल्या अणिमा शक्तीचा उपयोग करुन आत शिरकाव केला आणि भगवान् शंकरांकडून यापूर्वी कोणीही न ऐकलेली अद्भूतकथा ऐकली व घरी आल्यावर आपल्या जया नामक भार्येस सांगितली. जया आणि देवी पार्वात या सखी असल्यामुळें वेगवेगळया विषयांवर चर्चा सुरु झाली..बोलताना जयाने पुष्पदंताने सांगितलेली कथा पार्वतीस सांगितली. ती ऐकुन पार्वतीस आश्चर्य वाटले तिने शंकरास विचारले तुम्ही मला सांगितलेली कथा कोणासच माहिती नव्हती ना तर पुष्पादंताच्या बायकोस कशी समजली. भगवान् आशुतोष यांनी नंदीकडे चौकशी केली. तेव्हा नंदीने पुष्पदंत आला होता असे संगितले पण त्याला आडवले होते हेही सांगितले.
भगवान् आशुतोष यांना त्याच्या अणिमा शक्ती माहिती असल्यामुळे त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. हा सर्व प्रकार पार्वतीस सांगितला. तिने गंधर्वराजास शाप दिला, तुला मनुष्य जन्म घ्यावा लागले. त्याने उ:शाप मागितला. तेंव्हा उमेने उःशाप दिला. मनुष्ययोनित गेल्यानंतर सुप्रतिक यक्ष भेटेल. त्याला कुबेराचा शाप मिळाल्यामुळे विंध्य पर्वातावर तो पिशाच्च होवुन हिंडताना दिसेल. त्याला सर्व हकीकत सांग म्हणजे तुला तुझे पहिले स्वरूप प्राप्त होईल.
अशाप्रकारे पुष्पदंताची शापातून मुक्तता झाली आणि त्याने शिवमहिम्नस्तोत्राची निर्मिती केली. पुष्पदंताने हे स्तोत्र खुप प्रसन्न भाषेत लिहले आहे. यात सर्व शास्त्रीय विचारांचा. परिपोष त्याने केला आहे. पुढे पुष्पदंताने कात्यायन नावाने जन्म घेतला. त्याने पाणिनीच्या अष्टाध्यायीत वार्तिक स्वरुपाने मोलाची भर घातली. अशा पुष्पदंतास साष्टांग दंडवत.
हे स्तोत्र म्हणायला अवघड असले तरी त्यामुळे भाषाशुद्धी होते, मन प्रसन्न होते शिवाय पापदोष निवारण होते. म्हणून या स्तोत्राचे श्रवण आणि शक्य झाल्यास पठण करावे असे सांगितले जाते.