गणवेश ही कल्पना शाळेपासून आपल्या परिचयाची आहे. यावरून वातावरणनिर्मितीला विशिष्ट पोषाखाची आवश्कता असते, हे निर्विवाद सिद्ध होते. देवकार्य म्हणजे पूजा, होम व नित्य आह्निक आणि पितृकार्य म्हणजे श्राद्ध यावेळेस अंगावर नेहमीचे कपडे ठेवून पूजा करणे योग्य नाही. यामागे नुसता धार्मिक दंडक आहे असे नाही, तर वैज्ञानिक कारणेही आहेत.
वास्तविक विवाहादि प्रसंगी कडक सोवळे पाळणे हा मूळीच उद्देश नसतो. कारण ज्या धार्मिक प्रसंगी पुण्याहवाचन केले जाते, तेथे स्वयंपाक घरात आणि बाहेरही कडक सोवळ्याची मूळीच अपेक्षा नसते. धार्मिक प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा जास्तीत जास्त परिणाम देह, मन व बुद्धी यावर व्हावयाचा असेल तर त्या व्यक्तीने समाजात वापरलेला, कुसंस्कारांनी भरलेला पोशाख स्वच्छ असूनही वापरू नये. शिवाय इतरांपेक्षा निराळा पोषाख परिधान केल्यावर त्या व्यक्तीबरोबर इतरांनी संपर्क साधण्याची क्रिया आपोआपच मंदावल्यामुळे धार्मिक कार्यात त्याचे पूर्ण लक्ष लागण्यास मदत होते.
ज्याप्रमाणे मैदानात उतरताना लंगोटा असेल तर वातावरण निर्मिती होऊन एखाद्या मल्लाला कुस्तीचे स्फुरण चढते, त्याप्रमाणे अंगावर उपरणे आणि स्वच्छ वस्त्र परिधान केल्यावर स्थानापन्न होताच धार्मिक संस्कारांविषयी श्रद्धा व सद्बुद्धी निर्माण होते.
पूर्वीच्या काळी एक म्हण प्रसिद्ध होती. `विकच्छ (विकच्छ म्हणजे कासोट्यावाचून) वस्त्र परिधान करून केलेल्या कर्माचे फळ राक्षस घेऊन जातात. यातील अतिशयोक्ती सोडल्यास गर्भितार्थ एवढाच की, नेसलेल्या वस्त्रामुळे धार्मिक संस्कार नीट उमटत नाहीत, त्याचेच नाव सोवळे!
विज्ञान तसेच संगणक प्रयोगशाळेत किंवा ऑपरेशन थेटरमध्ये पादत्राणे घालून जाऊ दिले जात नाही. तेथे खऱ्या अर्थाने कडक सोवळे पाळले जाते. धार्मिक कार्य करताना पितांबर नेसून अंगावर उपरणे पांघरण्याची शास्त्रज्ञा असल्यास त्यात वावगे काहीच नाही. अर्थात प्रयोग आणि अनुभव हाच वरील निष्कर्षाची खात्री पटवू शकेल.
वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास रेशीम आणि लोकरीचे वस्त्र अधिक लाभदायक ठरते. कारण धार्मिक कार्याच्या वेळी मंत्रोच्चारातून उठणारी स्पंदने व विद्युत लहरी शिघ्रतया अंगभर फिरवण्यास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अधिक उपयोगी पडते. शिवाय अशी वस्त्रे स्वच्छ करण्यासही सोपी असतात. लोकरीची धाबळी नुसती झटकली तरी ती स्वच्छ होते असे दिसून येते. म्हणून पूजा, जप, वाचन, संस्कार, अनुष्ठान, पुरष्चरण इ. धार्मिक कार्याच्या प्रारंभी पितांबर, लोकरीचे वस्त्र किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून अंगावर उपवस्त्र घ्यावे असे शास्त्र सांगते.