माणसाला निसर्गदत्त एक मोठी देणगी मिळाली आहे. ती म्हणजे मन.. मन हे असे पात्र आहे कि ज्या गोष्टी आपण पूर्णपणे स्वीकारू शकत नाही किंवा ज्या गोष्टीपर्यंत आपल्याला तात्काळ पोहचणे कठीण आहे तिथे ते एका क्षणार्धात फेरफटका मारून येते. तसेच या मनाचा परिणामकारक गुणधर्म म्हणजे ते आहे. त्याच्या या चंचलतेमुळे अनेकदा आपल्याला फटका देखील बसतो. तसेच हे मन सतत मनुष्याभोवती आकर्षणाचे चक्रव्यूह उभे करत असते. जे भेदणे मनुष्य देहाला फार कठीण असते व त्यात तो कालानुकाल गुरफटत जातो. सतत एकाच गोष्टीचं आकर्षण वाटत राहणे शक्य नाही. म्हणून हा आकर्षण विकर्षणाचा खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कायम सुरु असतो. त्यातून वेळेचं जागे होणे हीच मनुष्य धर्माची सार्थकता होय.नाहीतर मोक्षाच्या शिखरावर पोहचणे जवळपास अशक्यप्राय होणार हे निश्चित आहे.
एक फकीर होता. तो रोज गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत देवळात जायचा. देवळात जाऊन भजन पूजन , ध्यानधारणा करत दिवस घालवायचा. संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या टोकावर असलेल्या झोपडीत परत यायचा. झोपडीतून देवळात जाताना त्याला निरनिराळ्या आकर्षक वस्तूंनी भरलेला बाजार , राजवाडा इत्यादी सर्व लागायचं पण तो मध्ये कुठंही न थांबता सरळ देवळात जायचा !
राजा त्या फकिराचा हा दिनक्रम रोज पहात होता. इकडं तिकडे न पाहता फकीर सरळ देवळात जातो. वाटेत कुठंही थांबत नाही. याचं त्याला मोठं कुतूहल वाटत होतं. एक दिवस त्यानं सेवकांना आज्ञा केली म्हणाला , " आज फकीर निघाला की , त्याच्या पायात फास टाका आणि त्याला वरच्यावर राजवाड्यात उचलून घ्या." त्याप्रमाणे केल्यावर फकिराला राजासमोर हजर करण्यात आलं. राजाला वाटलं होतं फकीर भयंकर खवळला असेल. त्याला शिव्या देत असेल पण फकीर आपल्या धुंदीत अगदी मश्गुल होता. राजाकडे बघत तो स्मितहास्य करत होता.
राजानं विचारलं , " जबरदस्तीने बंदिस्त करून सुद्धा तू एवढा शांत कसा ?"फकीर म्हणाला, " त्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे रस्त्यात काहीही अडथळा आला तरी माझे ध्येय मंदिर आणि देवदर्शन हे होते.त्याकडे मी अविचल,शांत होऊन जात असतो. रस्त्यात अनेक आकर्षक वस्तू असतात. त्या मला दिसतातही. पण त्याकडं माझं बिलकुल लक्ष नसतं ! माझं सगळं ध्यान देवळातल्या देवाकडं लागलेलं असतं आणि दुसरं कारण म्हणजे आज जसं तू मला उचलून घेतलंस तसं एक दिवस माझा देव मला सत्वगुणाचे फास टाकून वर उचलून घेईल अशी खात्री आहे."
साधूला हे माहीत होतं की , देवळात जाताना ज्या ज्या आकर्षक गोष्टी दिसतायत त्या आज आकर्षक दिसतायत , उद्या आपला मूड बदलला की , याच वस्तू टाकाऊ होतील. माणसाचं मन मोठं चंचल असतं. त्याला एकाच गोष्टीचं आकर्षण सतत वाटणं शक्य नाही. हा आकर्षण विकर्षणाचा खेळ आयुष्यभर चालू असतो. त्यातून आपण जागं व्हायला हवंय.
आपण फक्त एकच काम करायचं आहे. अविचल राहून निष्काम कर्म करत राहायचं आहे. निष्काम कर्म करण्याला फारफार महत्व आहे. हा संपूर्ण अध्याय निष्काम कर्म करण्याच्या महात्म्यावरच आधारित आहे असं म्हणायला हरकत नाही.