योग तुम्हाला जीवनाच्या उच्च आयामांकडे घेऊन जातो किंवा जीवनाची एक उच्चकोटीची आकलनशक्ती प्रदान करतो. आसन म्हणजे शरीराची एक स्थिती. अशी स्थिती जी तुम्हाला जीवनाच्या उच्च शक्यतेकडे घेऊन जाते. त्या स्थितीला ‘योगासन” म्हणतात. योगासनांमध्ये ८४ प्राथमिक योगासने आहेत जी तुमचे चैतन्य उच्च पातळीला घेऊन जातात. जेव्हा आपण ८४ आसने असे म्हणतो, तेव्हा त्या फक्त ८४ शारीरिक स्थिती आहेत असा त्याचा अर्थ लावू नका. या ८४ पद्धती आहेत, आत्मसिद्धीचे ८४ प्रकार आहेत. पण एक योगी फक्त एका आसनावर प्रभुत्व मिळवतो, त्याला आसन सिद्धी असे म्हणतात.आसन सिद्धी म्हणजे एखादी व्यक्ति एखाद्या विशिष्ट स्थितीत अगदी सहज, आरामात बसू शकणे. आत्ता या क्षणी तुम्ही तुमचे शरीर तुम्ही कोणत्याही स्थितीत ठेवले तरी त्यात आराम नसेल. तुम्ही बसला असलात, तर ते आरामात नसेल. तुम्ही उभे असाल, तर ते आरामात नसेल. तुम्ही आडवे पडला असाल, तरी ते आरामात नसेल. मग काय करायचं? पण जर तुम्ही योग शिकलात, तर हळूहळू तुम्हाला तुमचे शरीर हलके आणि एका नैसर्गिक आरामाच्या स्थितीत आल्याचे जाणवेल. तुम्ही जर एखाद्या स्थितीत बसलात तर ते पूर्णपणे आरामशीर असेल. मग ते दुसऱ्या प्रकारे बसण्याचा प्रयत्न करणार नाही.
पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारे हठयोग केला जातो, ते पाहून तर मला भीतीच वाटते. तिथे सर्वप्रकारचे वेडेवाकडे, बेढब प्रकारे योग केला जातो. योगासने म्हणजे व्यायाम नव्हे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. योगासने म्हणजे तुमची ऊर्जा एका ठराविक दिशेला नेऊन सक्रीय करणाऱ्या नाजूक प्रक्रिया आहेत. मी हे मुद्दाम सांगण्याचे कारण सामान्यतः व्यायाम म्हटलं की ‘मी जितका अधिक जोर लावेन तितका मी जास्त मजबूत’ अशी वृत्ती असते. आसने किंवा योग असे कठीण परिश्रम करून करायचे नसतात. ही काही स्पर्धा नाही. तुम्ही ही वृत्ती तात्काळ सोडून दिली पाहिजे. योग पूर्णतः सजग राहून, सहजपणे आणि जमेल तितक जाणीवपूर्वक करणे खूप महत्वाचे आहे.