एका महिन्यात २ एकादशी असतात, म्हणजेच तुम्हाला एकादशीला महिन्यातून फक्त २ वेळा व वर्षाच्या ३६५ दिवसांत २४ वेळा उपवास करावा लागतो. अधिक मास आला तर त्या वर्षी २ एकादशी जोडल्या जातात आणि त्या २६ होतात. दर महिन्यात येणाऱ्या एकादशीचे वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळे नावसुद्धा आहे. ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येते. पैकी निर्जला एकादशी झाली आणि १४ जून रोजी योगिनी एकादशी आहे. एकादशी व्रताचे फायदे आपल्याला माहीत आहेच, योगिनी एकादशीचे महत्त्व, कथा आणि हे व्रत केल्याने होणारे फायदेही जाणून घेऊया.
१. योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते.
२. या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो.
३. योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते.
४. असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते.
५. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते.
६. असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे, एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते.
७. ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप, गुण आणि प्रसिद्धी मिळते.
योगिनी एकादशी व्रताची कथा:
अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेर याच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा. त्या माळीचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे, मानसरोवरहून फुले आणणे. एके दिवशी तो आपल्या पत्नीबरोबर फिरायला गेलेला असल्यामुळे त्याला फुलं घ्यायला उशीर झाला होता. तो उशीरा कुबेरांच्या सभेला पोहोचला. यामुळे रागावलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला.
शापाच्या परिणामामुळे हेम माळी इकडे-तिकडे भटकत राहिले आणि भटकत असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचले. योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याच्या दु: खाचे कारण जाणून घेतले. व त्याला सांगितले की जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापातून मुक्तता मिळेल. माळीने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताच्या परिणामी हेम माळीचा कुष्ठरोग संपला.
व्रत विधी : या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी. त्यांना तुळस व कमळ वाहावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास सोडावा. शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा, त्याने एकादशीचे पुण्य दुप्पटीने मिळते.
असे हे व्रत सर्वांचे दुःख, दैन्य, दारिद्रय दूर करणारे ठरो अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया.