धार्मिक पूजेत शंख वादनाला अतिशय महत्त्व आहे. कारण त्यामुळे वातावरणातील नकारात्मक लहरी दूर होतात. शिवाय शंख हे रणवाद्य म्हणूनही वापरले जात असे. भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला. मंगलकार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही.
धर्मशास्त्रातील शंखाचे महत्त्व :
हिंदू धर्मशास्त्र अभ्यासक सुधा धामणकर शंखाचे महत्त्व आणि त्याची महती सांगतात, हिंदूंच्या देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात. देवतापूजनाचे आधी शंखाचीच पूजा असते. हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच, देवाजवळचा शंख आहे. सर्व मंगलकार्यात शंखनाद करणे पवित्र मानले जाते. युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंखाचा आवाज काढतात. भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे. लहान मुलाची प्रकृति सुधारण्यासाठी, त्याचे आयुष्य वाढण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख, मंत्रसंस्कार करून बांधत असत. शंखभस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे.
'शंख' शब्दाची व्युत्पत्ती :
श खनति अशी शंख शब्दाची फोड कोशकार करतात. जो कल्याण निर्माण करतो, दारिद्र्य घालवतो, तो शंख. मंदिरामधून देवताना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करीत शंखामध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात. स्नान घालतात. देवतांचे तीर्थ घेऊन `गंगा' अंगावर घेतली, या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात.
शंख वादनामुळे आरोग्याला होणारे लाभ जाणून घ्या :
१. थायरॉईड नियंत्रित राहते २. फुफुसांची क्षमता वाढते ३. दृष्टिदोष दूर होतो ४. मन शांत होते५. मेंदूला व्यायाम मिळतो ६. नैराश्य दूर होते ७. गळा आणि आवाजाशी संबंधित विकार दूर होतात. ८. दीर्घ श्वसन होऊन पूर्ण शरीराला रक्तपुरवठा चांगला होतो. ९. डोळ्यांना व्यायाम मिळतो. १०.आजूबाजूच्या वातावरणातील विषाणू नष्ट होतात
त्यामुळे स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा ज्येष्ठ शंखनादाचा सराव सर्वांनी करायला हवा. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही घडेल हे नक्की!