लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली. चक्रधर बगमारे (२५) रा.चप्राड ता.लाखांदूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.२३ डिसेंबर २०१५ रोजी लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे पीडित ११ वर्षीय मुलगा हा घराशेजारी मुलासोबत खेळत होता. घरासमोर कार्यक्रम सुरु असल्याने सायंकाळी त्याच मुलांसोबत जेवणासाठी गेला. परंतु तिथून तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटूंबीयांनी त्याची शोधाशोध केली. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास हा मुलगा रडतरडत घरी आला. त्यानंतर पित्याने काय झाले असे मुलाला विचारले असता त्याने आपबिती सांगितली. त्यानंतर या मुलाच्या वडिलाने लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन आरोपीविरुध्द भादंवि ३७७ व लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी करून आरोपी चक्रधर बगमारे याला अटक केली. तपासात आरोपीविरुध्द पुरावे गोळा करून विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे साक्ष पुरावे तपासले असता आरोपीविरुध्द दोष सिध्द झाले. त्यावरून न्यायाधिशांनी भादंवि ३७७ कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियमान्वये सात वर्षे सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड.रमाकांत खत्री यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे व भलावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:44 AM
एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली.
ठळक मुद्देचप्राड येथील घटना : अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय