सहकार क्षेत्रातील पहिला उपक्रम : बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचा पुढाकार
भंडारा : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांच्या जीवाची सुरक्षितता जोपासण्यासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला. बँकेचे कर्मचारी तथा त्यांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरणाचे आयोजन आज शनिवारला करण्यात आले होते. यात पहिल्या टप्प्यात झालेल्या या लसीकरणात १०० जणांना लस देण्यात आली.
भंडारा जिल्हा को-ऑप. बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या पुढाकारातून सकाळी १० वाजतापासून बँकेच्या मुख्य कार्यालयात बँक, तसेच सेवा सहकारी संस्थांचे कर्मचारी यांच्यासाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या सहकार्यातून हे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या प्रयत्नाने सहकार क्षेत्रात कार्यरत कर्मचारी तथा त्यांच्या कुटुंबीयांसाठी घेण्यात आलेला लसीकरणाचा हा पहिलाच उपक्रम ठरला.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व आरोग्य विभाग भंडारा यांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग सतत वाढत असतानाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी त्यांच्या खातेदारांना सेवा देत आहेत. ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात प्रभाव असताना, शेतकऱ्यांच्या कर्ज वाटप मोहिमेसाठी काम करीत आहेत. बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनीही कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हित जोपासत त्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहीम आयोजित केली. जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, तसेच सेवा सहकारी संस्थांचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या को-व्हॅक्सिन लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. यात आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा लाभ १०० जणांनी घेतला.
कोट
दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण लवकरच
पहिल्या टप्प्यात बँकेचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना लस देण्यात आली. दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी, विविध सहकारी सोसायटीचे गट सचिव आणि अध्यक्ष यांच्यासह त्यांच्या कुटुंबासाठी लसीकरणाचे नियोजन आहे. याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच सर्वांना लस मिळेल.
- सुनील फुंडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा