लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ खरेदी केंद्रांना मान्यता दिली असली तरी अनियमिततेमुळे १०५ खरेदी केंद्रांची मान्यता धाेक्यात आली आहे. अद्याप या केंद्रांनी दंड भरला नाही. त्यामुळे त्यांची खरेदीची मान्यता पणन विभागाने राेखून धरली आहे. सध्या केवळ ७१ केंद्रांवर धान खरेदी सुरु आहे. पणन महासंघाने जिल्ह्यात २३३ केंद्रांना धान खरेदीची परवानगी दिली आहे. त्यात ५० नवीन केंद्रांचा समावेश आहे. या ५० केंद्रांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळेही त्यांची खरेदी मान्यता रखडली आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अनियमितता करणाऱ्या १०५ केंद्रांना दंड ठाेठावण्यात आला. त्यात ७७ केंद्रांना ५० हजार रुपये, तर २८ गंभीर स्वरुपाच्या असलेल्या केंद्रांना एक लाख रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. या केंद्रांनी अद्याप दंडाची रक्कम भरली नाही. त्यामुळे त्यांची धान खरेदीची परवानगी रखडली आहे. परिणामी जिल्ह्यात अद्याप संथ गतीने धान खरेदी सुरू आहे. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी टाहाे फाेडत आहेत. मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने धान खरेदीसुरु झाली नाही. गतवर्षी ३१ ऑक्टाेबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला हाेता. मात्र यावर्षी नाेव्हेंबरचा दुसऱ्या आठवड्यात धान खरेदीला सुरुवात झाली. परंतु अद्यापही वेगाने धान खरेदी सुरु झाली नाही. अनियमिततेमुळे १०५ केंद्रांची मान्यता रखडली असून त्यांनी तात्काळ दंड भरल्यास धान खरेदीची परवनगी दिली जाणार आहे. मात्र अद्यापतरी त्यांनी दंडाची रक्कम भरली नव्हती.
७५ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नाेंदणी - आधारभूत धान खरेदी अंतर्गत आतापर्यंत ७५ हजार ६५१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी केली आहे. जिल्ह्यात सुमारे सव्वा दाेन लाख शेतकरी आहेत. नाेंदणीची अंतीम मुदत ३० नाेव्हेंबर असून शेतकऱ्यांसाठी पणन महासंघाने ॲप विकसित केला आहे. त्यामुळे नाेंदणीची प्रक्रिया आता जलदगतीने हाेणार आहे.
दाेन दिवसात १५२ क्विंटल धान खरेदी - पणन महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्याच्या एक दिवस आधी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ केला. मात्र अद्याप पूर्ण क्षमतेने येथे धान खरेदी सुरू झाली नाही. केवळ दाेन दिवसात १५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७५ हजार ६५१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाेंदणी केली असून, ७५ शेतकऱ्यांनी नाेंदणीचा ॲप डाऊनलाेड केला आहे. त्यामुळे आता थेट शेतकऱ्यांना नाेंदणी घरूनच करता येणार आहे.
जिल्ह्यात ७१ केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ ऑनलाइन नाेंदणी करून खरेदी याेजनेचा लाभ घ्यावा.- अजय बिसने, सहायक जिल्हा पणन अधिकारी