चिचाळ (भंडारा) : शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील चिचाळ येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, रविवारी शोकाकुल वातावरणात चिचाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलोनी विनोद नखाते (१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती चिचाळ येथील जिल्हा परिषद विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. शनिवारी विनोद नखाते पत्नी संगीतासोबत बटईने केलेल्या शेतावर शेळ्या घेऊन गेले होते. तर सलोनी शनिवारी सकाळची शाळा आटोपून आईवडील असलेल्या शेतात गेली. त्यावेळी आईने तिला शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी शेताच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या विहिरीवर पाठविले. विहिरीतून बादलीने पाणी काढताना पाय घसरून ती विहिरीत पडली.
मुलगी अद्याप का आली नाही म्हणून आईने विहिरीकडे जाऊन बघितले. तेव्हा विहिरीच्या काठावर सलोनीच्या चपला दिसल्या. मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरड सुरू केली. वडिलांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत बघितले असता सलोनी दिसली नाही. गावात या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
रविवारी शोकाकुल वातावरणात चिचाळ येथे सलोनी हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. सलाेनीच्या परिवाराला राजीव गांधी अपघात योजनेतून मिळणारी आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली. अड्याळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष मस्के, राजेंद्र केळकर करीत आहेत.