भंडारा जिल्ह्यात माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. या शाळांमधून दहावीचे १८ हजार १११ विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. यापैकी ९९ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अर्जही सादर केले होते. या अर्जासोबत प्रत्येक विद्यार्थ्याने ४५० रुपये याप्रमाणे शुल्कही भरले होते. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार होती. मात्र, कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. आता परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे याबाबत राज्य शिक्षण विभाग निर्णय काय घेते, याकडे पालक व विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, दहावीची परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या प्रश्नामुळेही पालक चिंतेत दिसून येत आहेत.
कोट
परीक्षा शुल्क मिळेल अथवा नाही, तो आमच्यासाठी महत्त्वाचा भाग नाही; परंतु परीक्षा झाली असती तर आमच्या अभ्यासाचे फलित झाले असते. माझा भ्रमनिरास झाला आहे.
उर्वेश दलाल, विद्यार्थी, भंडारा
कोट
उशिरा का असेना दहावीची परीक्षा होईल असे वाटत होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने माझा भ्रमनिरास झाला आहे. आता परीक्षा शुल्क मिळेल तरी त्याचा उपयोग काय, परीक्षा व्हायला हव्या होत्या.
-प्रज्वल रामटेके, विद्यार्थी, भंडारा
कोट
ऑफलाइन परीक्षा झाल्या नाहीत. आता परीक्षा नाही तर किमान बोर्डाने परीक्षा शुल्क परत करायला हवे. आता गुणांकन पद्धतीने गुण कसे मिळणार याची प्रतीक्षा आहे.
- प्रतीक्षा साळवे, विद्यार्थिनी, भंडारा
बॉक्स
परीक्षाविना कंटाळले विद्यार्थी
कोरोना संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. आधीच कोरोनामुळे वर्गही नियमितपणे झाले नाहीत. त्यातही आता परीक्षेच्या घोळामुळे विद्यार्थी कंटाळले आहेत.
एकूण माध्यमिक शाळा ७४
एकूण विद्यार्थी १८१११
परीक्षा शुल्क ४५०
एकूण शुल्क ८१,४९,५००