औरंगाबाद : शहर पोलीस दलातील विविध कारणांमुळे निलंबित असलेल्या ११ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दिवाळीच्या पूर्वसंध्येला निलंबन रद्द करून त्यांना विविध ठिकाणी पुनर्स्थापना देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवाळी आनंदोत्सव द्विगुणित झाला. शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना एक जणाकडून गजानन महाराजांचे शेगाव (जि.बुलडाणा) येथे लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. तर तक्रारदाराचे परस्पर कॉल डिटेल्स काढल्याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यातील महिला फौजदारास काही दिवसांपूर्वी निलंबित क रण्यात आले होते. शिवाय अन्य ११ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. ठाकरे यांना हायकोर्ट सुरक्षा विभाग येथे पदस्थापना देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली.
शिवा ठाकरेंसह ११ अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:33 AM