भंडारा : अचानक पाणी वाढल्याने चुलबंद नदीच्या मध्यभागी दगडावर डोंगा आदळल्याने अडकलेल्या ११ जणांची नावाड्याच्या सतर्कतेने सुखरूप सुटका झाली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील आवळी-सोनी घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. भर पुरात दगडावर उतरून दुसऱ्या डोंग्याच्या साहाय्याने जीव वाचविला. नावाड्याने सतर्कता दाखविली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
लाखांदूर तालुक्यातील आवळी येथील छगन दिघोरे, ज्योती छगन दिघोरे, रमा मेश्राम, आशा मेश्राम, जितेंद्र शहारे, मंगला संगोळे, इंदोरा येथील ढोरे तर सोनी येथील आशिष नखाते, आसाराम वाढई यासह डोंगा चालक नारायण कुंभले व पांडुरंग कुंभले मंगळवारी एका डोंग्यातून चुलबंद नदी पार करीत होते. दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने अचानक चुलबंद नदीला पूर आला. पाण्याच्या वेगाने डोंगा नदीपात्रात मध्यभागी असलेल्या एका दगडाला आदळला. पाणी डोंग्यात शिरल्याने सर्व जण घाबरले. डोंगा उलटण्यापूर्वी डोंग्यात बसलेले छगन दिघोरे यांनी प्रसंगावधान राखत दगडावर उतरून इतरांना डोंग्यातून त्या दगडावर सुखरूप उतरविले. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या इतर डोंगा चालकांना आवाज देऊन मदतीची मागणी केली. त्यावरून डोंगा चालकांनी तत्काळ नदीच्या मध्यभागात पोहोचून दगडावर उतरलेल्या ११ ही जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
डोंग्यातून जीवघेणा प्रवास
शासनाने आवळी येथील नागरिकांचे लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे पुनर्वसन केले आहे. पावसाळ्यापूर्वी स्थानांतरण करण्याची नोटीस काही दिवसांपूर्वी लाखांदूर तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र पुनर्वसन झालेल्या गावात सुविधा पुरेशा नसल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी पुनर्वसित गावात जाण्यास विरोध केला. आता पावसाळ्यात चुलबंद नदीतून डोंग्याच्या मदतीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.