इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांमुळे संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील माजी मालगुजारी अर्थात मामा तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे जिल्ह्यातील ११५४ मामा तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. २५ हजार हेक्टर सिंचन क्षमता या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून निधीच मिळाला नाही.गोंड राजांच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात सर्व तलाव तत्कालीन जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. म्हणूनच या तलावांना आता माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दलघमी असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. सिंचनासोबतच या तलावांचा उपयोग मत्स्य पालनासाठीही केला जातो. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या तलावांतील गाळ काढण्यात आला नाही. अनेक तलावांची पाळी फुटली असून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. तलावांवर अतिक्रमण झाले असून देखभाल दुरुस्ती होत नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या तलावांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी मिळतो. मात्र, तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळाला नाही.
तीन कोटी १० लाखांचा प्रस्ताव- भंडारा जिल्ह्यातील मामा तलावांचे खोलीकरण, पाळी बांधणे, कालव्यांची दुरुस्ती, गेट दुरुस्ती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने तीन कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव नागपूर येथील मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत या तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही.