लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: लाखनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे तुडतुडा, खोडकिडी, गादमाशी आदी किडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत करावी अशी मागणी ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पटले यांनी केली आहे.
तालुक्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० या कालावधीत तुडतुडा किडींमुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या जिरायती खरीप पिकाखालील धानाचे क्षेत्र ७६० हेक्टर आहे. यामुळे २ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे ५१ लक्ष ६८ हजार रुपयाचा निधी शासनाकडून अपेक्षित आहे. आश्वासीत सिंचनाखाली ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान ३ हजार ४६५ हेक्टर आर क्षेत्रात धानाचे झालेले आहे. यामुळे १० हजार २४८ शेतकरी प्रभावित झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे ४ कोटी ६७ लक्ष ७८हजार रुपयाचा शासकीय निधी अपेक्षित आहे.
तालुका प्रशासानातर्फे तहसीलदार मल्लीक विराणी खंडविकास अधिकारी डाॅ. शेखर जाधव, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांच्या नेतृत्वात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी सर्वेक्षण करुन नुकसानीबाबत माहिती शासनाला दिली आहे. धान शेतकऱ्यांना धान किडीमुळे उत्पन्न मिळाले नाही. धान रोवणी ते काढणीपर्यंतचा खर्च निघाला नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सदर शेतकऱ्यांना डोक्यातील अश्रू पुसण्याची भूमिका शासनाने पार पाडावी अशी मागणी अशोक पटले यांनी केली आहे.