लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सामाजिक न्याय विभाग हा गरजू नागरिकांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक साहाय्य पुरवित असतो. मात्र, सद्यस्थितीत या विभागात मंजूर १८ पदांपैकी केवळ ५ पदेच भरण्यात आली आहेत. ज्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. वरिष्ठाचे पद रिक्त असल्याने ही जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर आहे.
भंडारा जिल्ह्याची राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या समाजकल्याण कार्यालयाची भव्य शासकीय इमारत आहे. मात्र, या कार्यालयात वर्ग १ व वर्ग २ च्या तसेच स्थायी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याची खंत नेहमीच ऐकण्यात येते.
याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. समाज कल्याण विभागामार्फत एकाच इमारतीत पाच महामंडळे, एक जात व्हॅलिडीटीचे कार्यालय, एक बहुजन विभागाचे कार्यालय, एक लायब्ररी, समाज कल्याण कार्यालय इतके कार्यालय असताना हे विभाग प्रभारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर कामकाज सुरू आहे.
जिल्हा परिषदेचा कारभारही प्रभारीवरचजिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. मात्र, अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मंजूर पदे १२ असून; चार पदे भरल्या गेली आहेत. वर्ग १ चे अधिकारीही प्रभारीच आहेत. या चार कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कामकाज सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर कार्यालय सुरू असल्याने समाजकल्याण विभागातील अनेक योजनांचा लाभ घेण्यास, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.
"नागरिकांना त्रास होणार नाही. आपली सामाजिक जबाबदारी आहे. याचे भान ठेवून काम करतो. वर्ग १ व वर्ग २ चे पदे भरतीची प्रक्रिया पार पडली असून, एप्रिलपर्यंत पूर्णपदे भरण्यात येणार आहेत."- डॉ. सचिन मडावी, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, भंडारा.
"कर्मचारी कमी असतानाही समाजकल्याण सभापती म्हणून माझी सामाजिक बांधिलकी जोपासत, जिल्ह्यातील तळागाळातील लाभार्थ्यांचा नुकसान होऊ नये म्हणून प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व योजनांचे लाभ देण्यात कुठेही कमतरता भासणार नाही. याची काळजी घेत आहे. मंगळवारी लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीन, सायकल व ताडपत्री वाटपाची यादी मंजूर केली असून, त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे." - मदन रामटेके, सभापती, समाजकल्याण विभाग, जि. प. भंडारा.