करडी (जि. भंडारा) : मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे सर्पदंशाने एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. प्रणय गौरीशंकर देवगडे (१४), रा. केसलवाडा असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. प्रणय हा जिल्हा परिषद हायस्कूल, पालोरा येथे वर्ग ८ वी मध्ये शिकत होता.
रविवारी गावात लग्न समारंभ होता. प्रणय याने लग्नात जेवण वाढण्याचे काम केले. दुपारच्या सुमारास लग्न कार्यक्रमात जेवण केल्यानंतर तो घरी गेला. आई-वडिलांना लपवून व मार पडण्याच्या भीतीने तो घरातच खर्रा लपवून ठेवायचा. कुणीही नसल्याची संधी साधून खायचा. जेवण झाल्यानंतर त्याला खर्रा खाण्याची तलब आली. त्याने खर्रा लपवून ठेवलेल्या ठिकाणी हात टाकून खर्रा काढण्याचा प्रयत्न केला असता सापाने दंश केला. हाताला रक्त लागले असताना उंदीर किंवा किड्याने चावा घेतला असावा, असा समज करून घरची जनावरे शेतशिवारात चराईसाठी घेऊन गेला.
सायंकाळदरम्यान अत्यवस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. घरच्यांनी विचारणा केली असता घाबरलेल्या स्थितीत खाटेवर झोपला असताना उंदराने चावा घेतल्याचा बनाव केला. परंतु, प्रकृती आणखी खालावताच त्यास खाजगी वाहनाने भंडारा सामान्य रुग्णालयात नेत असताना खडकी गावाजवळ सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भंडारा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोमवारी सकाळी केसलवाडा येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
===Photopath===
140621\img-20210614-wa0043.jpg
===Caption===
सर्प दंशाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू