राहुल भुतांगे
तुमसर : तालुक्यात आजपर्यंतची रेती घाटावर करण्यात आलेल्या कारवाईपैकी सोमवारी तामसवाडी रेती घाटावर मोठी कारवाई करण्यात आली. ‘लोकमत’ने ‘तामसवाडी घाट बनला रेती तस्करांचा अड्डा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. याची दखल घेत थेट उपजिल्हाधिकाऱ्यानी स्वतः रेती घाटावर जाऊन पोलिस व वनविभागासोबत कारवाई केली. परिणामी तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील तामसवाडी येथील रेती घाटामध्ये अनधिकृतरित्या वाळूचीतस्करी केली जात होती. स्थानिक महसूल विभाग व पोलिस विभाग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळूतस्करीवर कुठलीही कारवाई करत नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना लोकमतने रेती घाटावरील वास्तव व गावकऱ्यांच्या समस्यांबाबत बातमी प्रकाशित केली.
त्याची दखल खुद नव्याने रुजू झालेले उपजिल्हाधिकारी यांनी घेतली. तुमसर तालुका गाठून तहसीलदारांसह, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, वनविभाग तुमसर आदीच्या चमूला तमासवाडी घाटावर पाचारण करून रेती तस्कराकडून उपसा केलेली रेती जप्त केली. मात्र त्या घाटावर कुणीच दिसून आले नसल्याने अधिकाऱ्यांचे रेती तस्कराशी असलेले आर्थिक संबंध उजागर करीत आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
तामसवाडी घाटातील रेती उत्खनन करून रेती तस्कर ती रेती वनविभागाच्या जागेवर रेती डम्पिंग करीत असल्याने तहसीलदार यांनी कारवाई करण्यास मनाई केली. तसेच तालुक्याच्या ठिकाणापासून ८ किमी अंतरावर असलेल्या तामसवाडी घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याची कल्पना कुणालाच कशी नाही. परिणामी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले उपजिल्हाधिकारी यांनी प्रकरणात तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा आहे.