निर्णयाविरूद्ध असंतोष : बांधकाम विभागाकडून उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यासाठी विलंब भंडारा : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी १५९ दारूची दुकाने मूळस्थानावरून हटवावी लागणार आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या दारूच्या दुकानांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान, मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटरच्या आत असलेले देशी-विदेशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश दिले. त्यापार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात ६५ टक्केच्या जवळपास देशी व विदेशी दारूची दुकाने ही राष्ट्रीय व राज्य मार्गावर आहेत. भंडारा जिल्ह्यात ६९ देशी दारूची किरकोळ विक्रीची दुकाने, ०७ वाईन शॉप, १५१ बार व परमीटरूम आणि २२ बिअर शॉपी असे एकूण २४९ दुकाने आहेत. याशिवाय ३ देशी दारूचे ठोक विक्रीची दुकाने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क खात्याने सर्वेक्षण करून अहवाल मागितला आहे. त्यानुसार भंडारा जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून जिल्ह्यात किती राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग आहेत, या महामार्गाचा क्रमांक कोणता आणि नकाशा यासह माहिती मागितली आहे. परंतु त्यांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. बांधकाम विभागाने उत्पादन शुल्क विभागाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर कोणत्या महामार्गावर किती दुकाने आहेत आणि जिल्ह्यात एकूण किती दुकाने महामार्गाच्या ५०० मीटरच्या आत येतात, हे स्पष्ट होईल. असे असले तरी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यातील ६४ टक्के दारूची दुकाने महामार्गावर येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २४९ दुकांनापैकी ६४ टक्के दुकाने गृहित धरल्यास १६० दुकाने महामार्गावर येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
१५९ देशी-विदेशी दारूची दुकाने महामार्गावरून हटणार
By admin | Published: January 05, 2017 12:27 AM