लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून गत महिनाभरापासून सुरू असलेल्या संपानेएसटी महामंडळाच्या भंडारा विभागाचे तब्बल १५ कोटींचे नुकसान झाले आहे. दीड हजारावर कर्मचारी संपावर ठाम असून ३६७ बसेस आगारात एकाच जागेवर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले. भंडारा विभागात ३० ऑक्टोबरपासून संपाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुमसर आगारातील कर्मचारी संपावर गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा, साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसान होत असून महिनाभरापासून सुरू असलेल्या या संपाने १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भंडारा विभागातील सहा आगारांत १८३५ कर्मचारी असून त्यापैकी दीड हजारावर कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या दररोज २६५२ फेऱ्या निघत होत्या. मात्र आता एकही फेरी निघत नाही. महामंडळाने कारवाईचा बडगा उभारला आहे.
साकोलीतून धावली लालपरी, डीएमने फाडली तिकिटे- साकोली : एसटी महामंडळाचा संप असला तरी गत दोन दिवसांपासून साकोली आगारातून तुरळक बसफेऱ्या सुरू आहेत. मंगळवारी व बुधवारी साकोली आगाराच्या दोन बसेस भंडारापर्यंत गेल्या. यावेळी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी स्वत: प्रवाशांना तिकिटे दिली. साकोली ते भंडारा बससेवा सुरू करताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात ही बस निघाली. बस क्रमांक एमएच ४० एल ८९८५ ही मंगळवारी ११.५० वाजता २७ प्रवासी घेऊन भंडाऱ्याकडे रवाना झाली. चालक लुंगाराम शिवणकर होते. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसाला दोन-तीन फेऱ्या सुरू राहतील, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले.
एसटीचे इंजीन लाॅक होण्याची भीती- गत महिनाभरापासून एसटी बसेस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. देखभाल दुरुस्तीही ठप्प आहे. त्यामुळे दीर्घकाळ बंद असलेल्या या बसेसचे इंजीन लाॅक होण्याची भीती आहे. तसेच ऑईलही गोठण्याची शक्यता आहे. यामुळे संप मिटला तरी एसटी सुरू करण्यासाठी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर कामावर येण्यास कुणी तयार नाही. लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. -डाॅ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक निरीक्षक