लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दर्शनासाठी गेल्यानंतर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मोहाडी तालुक्यातील माडगी येथील मंदिरात अडकलेल्या १५ ही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि करडी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी नावेच्या मदतीने भाविकांना बाहेर काढण्यात आले. यामुळे प्रशासनासह भाविकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वैनगंगा नदीच्या पात्रात मोहाडी व तुमसर तालुक्यांच्या सीमेवर नृसिंह मंदिर आहे. बुधवारी सकाळी मुंढरीचे सात, हिवराचे दोन, आंधळगाव येथील दोन, तुमसर व तामसवाडी येथील प्रत्येकी एक असे भाविक दर्शनासाठी गेले होते. मात्र, संततधार पावसाने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुजारी मनोहर निंबार्ते यांच्यासह १५ भाविक मंदिरात अडकले. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण संचारले हाेते. अखेर करडी पोलिसांना माहिती कळताच त्यांनी तहसीलदार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. मंदिरात सात स्त्रिया व आठ पुरूष अडकल्याचे पुढे आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तुमसर उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे, तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले. मात्र, बुधवारी रात्र झाल्याने बचाव कार्यास पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आले. सर्व भाविकांना दोन नावांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे, तुमसर तहसीलदार बाळासाहेब टेळे, करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, तुमसर ठाणेदार सुरेंद्र चिंचोळकर, बचाव पथकाचे दोन अधिकारी व २३ कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी वैभव काळे, रोहित नंदेश्वर उपस्थित होते.
करडी पोलिसांनी नदी तीरावर रात्र काढली जागून- माडगी येथे सायंकाळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल दाखल झाले. मात्र, रात्र झाल्याने भाविकांनी सकाळी बचाव कार्य करण्याची विनंती केली. त्यामुळे करडी पोलिसांनी नदी तीरावर अख्खी रात्र जागून काढली. पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसून येताच भाविकांना उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री दरम्यान भाविकांची अनेकदा आस्थेने विचारपूस करण्यात आली. घाबरू नका, आम्ही सुखरूप बाहेर काढू, असा धीर देण्यात आला.