तुमसर : एका पिसाळलेल्या कुत्र्याने येथील आठवडी बाजारात धुमाकूळ घालत १५ जणांना मंगळवारी दुपारी चावा घेतला. दोन तास या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने या कुत्र्याचा बंदोबस्त केला.
मंगळवारी तुमसर येथील आठवडी बाजार नेहमीप्रमाणे सुरू होता. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान काळ्या रंगाचा कुत्रा बाजारात शिरला. लोकांचा जमाव पाहून तो आणखी चवताळला. नागरिकांना चावे घ्यायला सुरुवात केली. अवघ्या दोन तासात त्याने १५ जणांना चावा घेतला. त्यात विजय इलमे (३८) रा. तुमसर, विशाल गणेश डोंगरे (३३) रा. देव्हाडी, जवाहर पटले (६०) रा. हसारा, राधेश्याम पटले (३५) रा.ह सारा, दीपक गुर्वे (३०) रा. नवरगाव, इंद्रदयाल गायकवाड (२२) रा. हसारा, उद्धव काटवले (२२) रा. तुमसर, तुमेर मोहम्मद (३३) रा. तुमसर, धम्मदीप हुमणे (१७), रक्षा कुरसुंगे (१७), गणेश महाजन (६२), विनय रंगारी (२५), ज्ञानेश्वर रामटेके (४९) सर्व राहणार तुमसर, अरविंद बोरकर (३५) रा. बोरी, देवाजी मोहनकर (४०) रा. धानोली, रामलाल झंझाड (४१) रा. हसारा, मंगेश कुंभलवार (३०) रा. चिंचोली, वासुदेव लोणारे (५४) रा. रुपेरा, मंगेश वासनिक (४०) रा. येरली, हिवराज मते (४५) रा. खैरलांजी अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. पिसाळलेल्या या कुत्र्याच्या धुमाकुळाने आठवडी बाजारात एकच हल्लकल्लोळ उडाला होता. कुत्र्यापासून बचावासाठी प्रत्येक जण धावपळ करताना दिसत होता.
अखेर कुत्र्याचा बंदोबस्त
१५ जणांना चावा घेतलेल्या या कुत्र्याच्या धुमाकुळाची माहिती आरोग्य सभापती पंकज बालपांडे यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या चमुला पाठवून कुत्र्याचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्यावरून चमूने पिसाळलेल्या कुत्र्याला सायंकाळी ६.३० वाजता ठार मारले, अशी माहिती आरोग्य निरीक्षक मोहन बोरघरे यांनी दिली.