तुमसर (भंडारा) : तुमसर शहरातील पॉश कॉलनी असलेल्या शहराबाहेर दुर्गा कॉलनीत मागील दहा दिवसात एका पिसाळलेल्या माकडाने परिसरातील १५ जणांना जखमी केले. त्यात तीन जणांना गंभीर जखमी केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर एकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी तुमसर वन विभागाचे पथक दाखल होऊन पिसाळलेल्या माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अद्यापही यश आलेले नाही.
दहा दिवसांपूर्वी एका चवताळलेल्या माकडापाठोपाठ दहा ते बारा माकडांची पिलावळं आली होती. त्यांनी आपले बस्तान दुर्गा कॉलनी व परिसरात जमविले. येथील झाडावर व उंच इमारतीवर ते राहू लागले. दरम्यान, चवताळलेल्या माकडाने दुर्गा कॉलनीतील सुमारे १५ जणांना पाठलाग करून जखमी केले. त्यात फुलनबाई रहांगडाले, सेवानिवृत्त पोलिस सोनवणे व कठोते नावाच्या व्यक्तींना चावा घेतला. त्यात दोघांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर कठोते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
माकडांमुळे येथे भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी, सायंकाळी, रात्री कोणीही घराबाहेर पडत नाही. येथील नागरिकांना लाठ्याकाठ्या घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. माजी नगरसेवक बाळा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले व सामाजिक कार्यकर्ते शिव बोरकर यांनी स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी यांनी माकडाची माहिती देऊन बंदोबस्ताची मागणी केली. सायंकाळी चारच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले पथकासह दाखल होऊन माकडाचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, माकडाच्या बंदोबस्ताकरिता भंडारा येथून विशेष वाहन व पथक बोलावण्यात आले. ही शोधमोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती.
वन विभागाची दिरंगाई
मागील दहा दिवसांपासून तुमसर शहरातील दुर्गा कॉलनीत पिसाळलेला माकड व इतर माकडाने उच्छाद मांडला आहे. याची कल्पना वन विभागाला असूनही गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक आले असून, आम्ही दूर्वा कॉलनी येथे माकडांचा शोध घेत आहोत. त्याचा बंदोबस्त लावण्यात येईल.
- सी. जे. रहांगडाले, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर