तंटामुक्त अभियान : लाखनीत सर्वाधिक तंटे सोडविलेभंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत भंडारा जिल्हयात गेल्या पाच महिन्यात १५११ तंटयांचा निपटारा करण्यात गाव तंटामुक्त समित्यांना यश आले आहे. जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत आॅगस्ट ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत २,२३८ तंटे दाखल झाले होते. त्यापैकी १,५११ तंटयांचे सामोपचाराने निराकरण करण्यात आले आहे. गाव पातळीवर छोटया छोटया कारणावरून निर्माण होणाऱ्या तंटयाचे पर्यवसन मोठया तंटयात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून आर्थिक नुकसान होऊ नये व समाजाची तसेच गावाची शांतता धोक्यात येऊ नये. या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी याकरीता शासनाने २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०१६ या वर्षाच्या अंमलबजावणीस १ आॅगस्ट २०१६ पासून सुरुवात झाली होती. या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत २,२३८ तंटे दाखल झाले होते. यापैकी १,५११ तंटयाचा निपटारा सामोपचाराने करण्यात पोलीस प्रशासन व तंटामुक्त गाव समित्यांना यश आले आहे.प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे असे या मोहिमेचे तीन टप्पे आहेत. या तिन्ही टप्प्यातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहिम ही लोकचळवळ म्हणून राबविण्यात यावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही चळवळ गावांनी व्यापक दृष्टीकोण ठेवून राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पाच महिन्यांत १,५०० तंट्यांचे निराकरण
By admin | Published: January 18, 2017 12:19 AM