भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या थकीत वीजबिलांच्या देयकाची एकूण रक्कम १२.२२ कोटी इतकी आहे. गतवर्षीपासून सुरू असलेला कोरोना प्रादुर्भाव आणि अन्य आर्थिक कारणांमुळे बहुतांश ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा केला नाही. त्यामुळे वीजबिलांची रक्कम वाढतच गेली. त्यानंतर वीज वितरण कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींना पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिल भरण्यासंदर्भात पाठपुरावा केला. परंतु, अनेक ग्रामपंचायती वीजबिल भरण्यास असमर्थ ठरल्या. परिणामी, वीज वितरण कंपनीला ग्रामपंचायतीचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यानंतर काही ग्रामपंचायतींनी एकूण बिलाच्या २० ते २५ टक्के रक्कम महावितरणकडे भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंत्यांनी दिली.
सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव आणि पावसाळा सुरू असल्याने पाणीपुरवठा नियमित असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात विषारी जीवजंतूंमुळे जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वीजबिलाचा तोडगा काढून सर्वच ग्रामपंचायतींचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.