लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत तीन दिवसांपासून आलेल्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील १६७४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. यात ६० घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. घरांची पडझड झालेल्यांमध्ये लाखांदूर तालुक्यातील ओपारा, विरली, ढोलसर व राजनी या गावांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक पवनी तालुक्यातील असून तेथील ३१० घरांची पडझड झाली आहे.
२१ जुलै रोजी रात्री दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील आसगाव येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. रस्त्यावर पाणी आल्याने बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. तहसीलदार व जिल्हा शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून सहकार्य करीत लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील ३१० घरांची अंशतः पडझड झाली तर पाच घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली. याशिवाय लाखांदूर तालुक्यातही रात्रीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ओपारा येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले. पूर्ण गावच पाण्याने वेढला गेला. यात ओपारासह राजनी, विरली व ढोलसर गावांतील एकूण १३६०घरांची पडझड झाली, तर ५५ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली होती. ढोलसर येथेही जिल्हा शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलीसंजय सरोवर व धापेवाडा बॅरेजचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीची इशारा पातळी गाठली आहे. सध्या धोका पातळी २४५.५० मीटर इतकी आहे. मंगळवार रात्री ८ वाजतापर्यंत ही पातळी २४४.७४ मीटर इतकी नोंदविण्यात आली होती. वैनगंगा नदीची इशारा पातळी जवळ येत असल्याचे दिसून आले आहे. तसेच धापेवाडा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने इशारा पातळी ओलांडण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिणामी, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा जिल्ह्याला असा बसला फटका
- एकूण घरांची पडझड - १६७४
- एकूण जमिनदोस्त घरे - ६०
- एकूण बाधित शेतकरी - १६६१०
- एकूण बाधित क्षेत्र (हे.) - ८५७५
१६,६१० शेतकरी बाधितगत २१ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीत भंडारा जिल्ह्यातील एकूण १६ हजार ६१० शेतकरी बाधित झाल्याचे समोर आले आहे. यात ८५७५ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये भात, सोयाबीन व कापूस पिकाचा समावेश आहे.