लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला.लाखांदूरजवळील चुलबंद नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ८ वाजता दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक दिली. त्यात रमेश बाळकृष्ण पिलारे (२६) रा. खैरीपट हा तरुण जागीच ठार झाला. मळेघाट येथून खैरीपटचे नागरिक लग्नसोहळा आटोपून परत येत होते. त्यांना हा अपघात दिसला. अपघातात गावातील एक तरुण ठार झाल्याचे पाहताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी नागपूर ते तिबेटकॅम्प (अर्जुनीमोरगाव) जाणाऱ्या बाबाश्री ट्रॅव्हल्सला पेटवून दिले. यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतू कुणी ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. अखेर अड्याळ, दिघोरी, पवनी आणि भंडारा येथून अतिरिक्त पोलीस दल पाचारण करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, काटे, लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम, पवनीचे ठाणेदार यशवंत सोलसे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी पुढाकार घेत नागरिकांची समजूत काढली. तेव्हा रात्री १२ वाजताच्या सुमारास रमेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी खैरीपट येथे तब्बल १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.ट्रॅव्हल्सचा झाला कोळसानागपूर ते तिबेटकॅम्प जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री पेटवून दिले. काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोळसा झाली. सुदैवाने या बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी आपल्या सामानासह खाली उतरले.
ट्रॅव्हल्स पेटविल्याप्रकरणी खैरीच्या १७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:14 PM
दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला.
ठळक मुद्देलाखांदूरची घटना : मध्यरात्री निवळला तणाव