लाखांदूर : तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील तब्बल १८०९ कुटुंबीयांचे घर अतिक्रमित जागेवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमणामुळे तालुक्यातील तब्बल २४६ लाभार्थ्यांचे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे बांधकाम रखडल्याची माहिती गटविकास अधिकारी गजानन अगर्ते यांनी दिली.
लाखांदूर तालुक्यात ६२ ग्रामपंचायती अंतर्गत ८९ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध गावात महसूल, वन व जिल्हा परिषद अंतर्गत जमीन असल्याची माहिती देण्यात आली. या ग्रामपंचायत क्षेत्रातील काही गरीब कुटुंबीयांद्वारा गत अनेक वर्षापासून अतिक्रमण करुन कुटूंबासह निवासी सोयीने राहत असल्याची माहिती आहे. गत अनेक वर्षापासुन अतिक्रमित जागेवर निवासी सोयीने राहत असलेल्या कुटुंबांकडून स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडून कर वसूल केले जात आहे. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत कर वसूल करुनही ग्रामपंचायतमधील नमुना आठ अभिलेखात मालक म्हणून सरकार अशी नोंद आहे. त्यामुळे अतिक्रमित कुटुंब विविध घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाच्या विविध घरकुल योजना अंतर्गत मागील काही वर्षांत ग्रामीण भागातील विविध कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र या मंजुरी अंतर्गत ग्रामपंचायत येथील नमुना आठमध्ये मालक म्हणून सरकार अशी नोंद असल्याने तालुक्यातील २४६ अतिक्रमणधारक कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित ठरले आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील तब्बल १८०९ कुटुंबांद्वारे महसूल, वन व जिल्हा परिषदेच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन निवासी सोयीने वास्तव्यास असल्याची माहिती आहे. मात्र गत अनेक वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवासी सोयीने वास्तव्यास असून देखील तब्बल २४६ कुटुंब घरकुलापासुन वंचित आहेत.