मोहाडी : तालुक्यातील १८१ अंगणवाडी ताईंनी बालविकास प्रकल्प कार्यालयात जाऊन त्रासदायक मिळालेले मोबाईलचा १८१ गठ्ठा बालविकास अधिकाऱ्यांना सोपविला.
शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत, या मोबाईची वॉरंटी संपलेली असून हँग होणे, बंद पडणे, डिसप्ले जाणे, असे प्रकार घडत आहेत .मोबाईल दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे .या प्रकाराला त्रासलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १७ ऑगस्टपासून राज्यभर शासनाला मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला. याची सूचना शासनाला आयटकने फेब्रुवारी महिन्यात दिली होती. १६ ऑगस्टपर्यत निर्णय शासनाने घेतले नाहीतर १७ ऑगस्टपासून मोबाईल परत करण्याला सुरुवात केली असून शुक्रवार २७ ऑगस्टला बालविकास प्रकल्प मोहाडी येथे अंगणवाडी सेविकाने मोबाईल कार्यालयात जमा केले. काही मोबाईल दुरुस्तीसाठी कार्यालयात दिले होते.
सूचना देऊनही प्रकल्प अधिकारी हजर नव्हते. आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा उपाध्यक्ष अल्का बोरकर, वंदना पशिने, संजू लोंदासे, गौतमी धवसे, शारदा कळंंबे, ललीता देवतारे, मंगला शेंडे, निर्मला बांते, जयश्री वैद्य, संगीता मारबते, माधुरी मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन मोबाईल परत केले.
शासनाने दिलेले सर्व जुने मोबाईल परत घेऊन नविन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे, मोबाईलमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, केंद्र शासनाने जुना काॅमन अप्लिकेशन एप्स (कँश) बंद करुन नवीन पोषण टँकर ॲप्स दिलेला असून तो सदोष आहे. सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टँकर ॲप्स मराठीत करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दिलेल्या मोबाईलची वाॅरंटी संपली आहे सतत हँग होणे, गरम होणे बंद पडणे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. दुरुस्तीचा येणारा खर्च सेविकांनाच करावा लागत आहे. रॅम कमी असल्यामुळे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी जागाच नाही. केंद्र शासनाने लादलेला पोषण टॅकर ॲप्स सदोष असून अंगणवाडी सेविकांवर लादला जात आहे. इंग्रजी न येणाऱ्या अनेक सेविकांना त्यात इतरांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम भरण्याची पध्दत अतिशय किचकट आहे. त्यामुळे उलट ताण वाढत आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी होत्या.
270821\img-20210827-wa0139.jpg
१८१ अंगणवाडी ताईंनी केले मोबाईल परत
मोबाईल कुचकामी: २४ सप्टेबर देशव्यापी संप