लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्हा रोजगार आणि उद्योजकता केंद्रामध्ये ७० बेरोजगारांची नोंद आहे. प्रशासनाकडून गत सहा महिन्यांत काही ठिकाणी रोजगार मेळावे घेतले जातात. मात्र यातून फार कमी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत असतो. यंदाच्या सहा महिन्यांत सहा रोजगार मेळावे घेण्यात आले. यात १८८४ बेरोजगार उमेदवारांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यांत ५६३ जणांची निवड केली असून, आतापर्यंत फक्त ९ जणांना नोकरी मिळाली आहे.
विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी कंपन्या येत नाहीत. त्यामुळे रोजगार निर्मिती शून्य आहे. पूर्वी दहावी, बारावी, पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात दस्तावेजाच्या छायांकित प्रती सादर करून नोंदणी केली जात होती. पण आता या कार्यालयाकडे बेरोजगारांनी पाठ फिरविली आहे.
६ महिन्यांत सहा मेळावेजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत गत सहा महिन्यांत सहा ठिकाणी सहा मेळावे घेण्यात आले आहेत. यातून फक्त ९ जणांना नोकरी मिळाली आहे.
बायोडेटा अपडेट कोण करणार?आठ-दहा वर्षे प्रयत्न करूनही नोकरी न लागल्याने अनेक बेरोजगारांकडे जुना बायोडेटा आहे. अनेकांनी आपला बायोडेटा अपडेट केलेला नाही. रोजगार मिळालेल्या युवक-युवतींना १० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा पगार विविध कंपन्यांत मिळाला असून, अनुभवानुसार यात दरवर्षी वाढ होणार आहे.
नवीन नोंदणीकडे बेरोजगारांची पाठसात वर्षापूर्वी ज्यांनी पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले, त्यांचीच नोंदणी प्रशासनाकडे आहे. नव्याने नोंदणी होत नाही. नोंदणी करूनही रोजगार मिळत नसल्याने बेरोजगारांनी नोंदणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या कार्यालयाकडे नोंदणी करूनही नोकरीची हमी GOVERNMENT नाही. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याच्या पद्धतीमुळे या कार्यालयाकडे नोंदणी करण्यासाठी युवक व युवती तसेच विद्यार्थी पुढे येत नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात ७० हजार बेरोजगारांची नोंद
- भंडारा जिल्ह्यात ७० हजारांच्या जवळपास बेरोजगारांची नोंद या कार्यालयात आहे. यापेक्षा कितीतरी बेरोजगार उमेदवार आहेत, पण त्यांनी येथे नोंदणी केलेली नाही.
- नोंदणी केलेल्यांमध्ये २०१५ पासूनचे पदवी, पदव्युत्तर तर इतर डिप्लोमा घेणारे आणि दहावी, बारावी झालेले उमेदवार असून, रोजगाराची मागणी करणारे बेरोजगार आहेत.
"ऑफलाइन आणि ऑनलाइन मेळाव्यांच्या आयोजनासाठी नियोजन करण्यात येत आहे. तुमसर येथे ५ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा मानस आहे."- सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा.