मोहाडी (भंडारा) : बेटाळा, रोहा व मोहगावदेवी येथील रेती घाटांवर तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या पथकांनी धाड घातली. तहसीलदारांसह पथकातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून रेतीची व जप्ती विक्रीचा सोपस्कार केला. या धाडीत एकाच वेळी महसूल विभागाने ३१३ ब्रास रेती जप्तीची मोठी कारवाई केली.
रेती डंपिंग व रेतीची चोरी थांबता थांबेना. तुम्ही काहीही करा आम्ही रेती चोरी करणारच, अशी भूमिका रेती चोरांनी घेतली आहे. शनिवारी तहसीलदार सुरेश वाघचौरे व तलाठी पराग तितीरमारे, वसंत कांबळे, वैभव जाधव, कोतवाल आरिफ शेख, अरविंद चोपकर तसेच वाहन चालक कृष्णा भोयर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी बेटाळा, रोहा व मोहगावदेवी घाटावर धाड घातली त्यात बेटाळा घाटावरून ११३ ब्रास रेती, रोहा घाट ८२ ब्रास रेती व मोहगाव देवी घाटावरून ११८ ब्रास रेती जप्त केली.
जप्तीची कारवाई दुपारी १ वाजता करण्यात आली. रेतीची मोजणी करण्यात आली. जप्तीची कारवाई ४ वाजता सुरू होऊन सकाळी ८ वाजता संपली. एकूण ३१३ ब्रास रेतीचा साठा शासकीय कंत्राटदाराला जागेवरच विक्री करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांनी बंदोबस्तासाठी दोन पोलिस कॉन्स्टेबल यांचे पथक तैनात ठेवले होते.