मोहाडी : मोहाडी तहसील कार्यालयाने २०१५ ते २०२१ या सहा वर्षांत एकूण १९ तहसीलदार बघितले असून, कोणत्याच तहसीलदाराला आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. आता पुन्हा चार दिवसांपूर्वीच नवीन तहसीलदार येथे रुजू झाले असून, ते किती दिवस येथे राहतील, हे येणारा काळच सांगेल.
विशेषतः शासकीय कार्यालयात बहुतांश अधिकारी वा कर्मचारी कमीत कमी दोन ते तीन वर्षांचा तरी कार्यकाळ पूर्ण करून जातात. यात दोन-चार अपवादही असतात. मात्र मोहाडी तहसील कार्यालयाची स्थिती काही वेगळीच आहे. तालुक्यातून वैनगंगा नदी वाहत जाते. या नदीच्या पात्रातील पांढऱ्या शुभ्र बारीक रेतीला सोन्यासारखा भाव आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक रेती तस्कर उदयास आले आहेत व त्यांचे मोठ्या राजकीय नेत्यांशी संपर्क सुध्दा आहेत. रेती माफियांवर कारवाई केली, तर राजकीय हस्तक्षेप निश्चितच होणार. तसेच मोहाडी तहसील कार्यालय संजय गांधी निराधार, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थींसाठी कुप्रसिद्ध आहेच. ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा खटाटोप येथे सुरू असतो व त्यासाठी तहसीलदारासोबत खटकेही उडतात. त्यामुळेच येथे कोणताही तहसीलदार जास्त काळ टिकत नाही. २०१५ पासून ते २०२१ म्हणजे आजपर्यंत १९ तहसीलदारांनी येथील कामकाज सांभाळले आहे. यात ११ प्रभारी तहसीलदार, तर आठ नियमित तहसीलदारांचा समावेश आहे.
बॉक्स
तहसीलदारांचा असा होता कार्यकाळ...
कल्याण डहाट (१ मार्च ते २३ एप्रिल २०१५), जे. बी. पोहणकर (१ जून ते १९ ऑगस्ट १५), जे. एन. सूर्यवंशी (१९ ऑगस्ट ते ३ नोव्हेंबर १५ ), धनंजय देशमुख ( ४ एप्रिल१६ ते १२ मे १७), सूर्यकांत पाटील (२३ मे १७ ते ५ डिसें. १८), धनंजय देशमुख (२८ फेब्रु. १९ ते २९ मे २०), देविदास बोंबर्डे ( ५ नोव्हे. २० ते २३ जुलै २१), दीपक कारंडे (२१ सप्टें. २१ पासून) हे आठ नियमित तहसीलदार व त्यांचा कार्यकाळ होता. आता आता रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांचे मार्च २१ मध्ये प्रमोशन असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तेही सहा महिनेच येथे राहतील. त्यानंतर पुन्हा येथे नियमित तहसीलदारांसाठी जनतेला वाट पाहावी लागणार आहे.