लाखनी (भंडारा) : वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून एका विद्यार्थिनीने स्वयंपाक खाेलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लाखनी येथील इंदिरानगरात शुक्रवारी उघडकीस आली. ती लाखनीच्या समर्थ महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला शिकत होती.
मारिया ऊर्फ खुशी अहमद सैय्यद (१९, रा. इंदिरानगर, सिपेवाडा रोड, लाखनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गुरुवार, दि. २१ जुलै रोजी रात्री वडील, आई व लहान भावासोबत ती जेवायला घरी बसली होती. त्यावेळी तिने माझा शुक्रवारी वाढदिवस आहे, मला पैसे हवे आहेत, असे पालकांना सांगितले. त्यावर वडिलांनी सकाळी कामावर जातो व सायंकाळी केक आणतो, असे सांगितले. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी गेले. शुक्रवारी पहाटे ४:३० वाजता वडील कामाला निघून गेले. लहान भाऊ कवनेल सैय्यद (१७) हा नळ फिटिंगच्या कामासाठी नागपूरला गेला. आई तबसुम अहमद सैय्यद ही सकाळी ७.३० वाजता गोंडमोहल्ला येथील मदरशात शिकवायला गेली.
त्यावेळी मारिया घरी एकटीच होती. वडिलांनी वाढदिवसाला पैसे न दिल्याच्या रागात स्वयंपाक खोलीतील लोखंडी हुकाला ओढणीने गळफास लावून घेतला. ही दुपारी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. मिलिंद भुते यांनी तपासून मृत घोषित केले. लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक गौरीशंकर कडव तपास करीत आहेत.