लाखनी (भंडारा) : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे दि पिंपळगाव सहकारी राईस मिल येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राईस मिलचे अध्यक्ष अविनाश कमाने, तसेच अतिथी म्हणून सरपंच श्याम शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य सिंधू नवखरे, संचालक कृष्णा रोकडे, केवलराम वाडीभस्मे, प्रशांत सिंगनजुडे, चंद्रशेखर बोरकर, प्यारेखा शेख, सतीश तागडे, सुनीता मते, आशा शिवणकर, संजू दोनोडे, किशोर शेंडे, व्यवस्थापक दिलीप बुराडे, उमेश मेश्राम, प्रदीप मेश्राम, प्रल्हाद तरोणे, आनंद दोनोडे, मनोहर सार्वे, श्रीकृष्ण कमाने, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी फुंडे यांच्या हस्ते फीत कापून खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतर वजन काट्याचे विधिवत पूजन करून धानाचे पोते मोजून खरेदी कार्याचा प्रारंभ करण्यात आला. मार्गदर्शनपर भाषणात फुंडे यांनी विदर्भातील पहिली भात गिरणी असलेली पिंपळगाव येथील राईस मिलने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगितले. शासनाने ऑक्टोबरपासून धान खरेदी सुरू करणे आवश्यक होते. परंतु, प्रशासकीय स्तरावर उशीर झाला असून, शासकीय आदेशानुसार जलदगतीने धान खरेदी केली जाईल, असे सांगितले. अविनाश कमाने यांनी प्रास्ताविक केले. बाळा शिवणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कृष्णा रोकडे यांनी आभार मानले.
नोंदणीचे काम सुरुच
जिल्ह्यातील २५६ धान खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी धान विकण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र धान खरेदी केंद्र त्या अपक्षेने सुरू झाले नसल्याने बळीराजा नाहक नागावला जात आहे. भंडारा जिल्ह्यात अ दर्जाच्या २० संस्थांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित संस्थांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानंतर अन्य केंद्रही सुरु करण्यात येणार आहे. दुसरीकडे धान खरेदी सुरु झाल्यानंतर साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. आधीच वेळेवर धान खरेदी सुरु झाली नाही. परिणामी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आली नाही. खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची नामुस्की आली. आधारभूत धान खरेदी केंद्राचा दर अधिक असून व्यापारी मात्र अल्प दरात धान खरेदी करीत आहेत. याचा फटकाही बळीराजाला बसत आहे.