देवानंद नंदेश्वर, भंडारा: मोहाडी तालुक्यातील खमारी (बु.) येथील आरोपी शुभम मनिराम माहुले (२९) याला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्ष सश्रम कारावास व चार हजार ५०० रुपये द्रव दंडाची शिक्षा सुनावली. हा आदेश भंडारा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी सुनावली.
याबाबत असे की, अल्पवयीन मुलगी बाराव्या वर्गात शिक्षण घेत होती. ती आरोपीच्या शेतात मिरची तोडण्यासाठी गेली असता त्याने मी तुला लाईक करतो, तू पण मला लाईक कर, असे बोलला असता तिने नकार दिला होता. तीने मोबाईलवर बोलण्यास देखील नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्या मुलीच्या नवीन घरी येवून अत्याचार केला. बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आई-वडीलांनी २५ जुलै २०२१ रोजी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन मोहाडी पोलिसानी शुभम माहुले याच्याविरुध्द भादंविच्या ३७६, ३७६(२)(एन), ५०६, तसेच बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सहकलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंदविला.
घटनेचे गांर्भिय लक्षात घेवून महिला पोलीस निरीक्षक रजनी तुमसरे यांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. तपास पुर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष पुराव्याच्या तपासाअंती सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी युक्तीवाद केला.