शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यानुसार तालुक्यातील ४ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊन ४ हजार ७९४ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. या प्रमाणिकरणाअंतर्गत ४ हजार ७२० शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तर ७४ शेतकऱ्यांचे अद्यापही प्रमाणिकरण होणे शिल्लक आहे. तालुक्यात कर्जमुक्तीचा लाभ झालेेल्या ४ हजार ७२० शेतकऱ्यांपैकी ४ हजार ७०४ शेतकऱ्यांनी सुमारे २१ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीला मान्यता दर्शविली आहे. तर केवळ १६ शेतकऱ्यांनी या कर्जमुक्तीला विविध कारणांनी अमान्यता दर्शविली आहे. कर्जमुक्ती योजनेच्या काही वर्षांपूर्वी कृषी पीककर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची परतफेड सुलभ व्हावी म्हणून रूपांतरित योजना राबवित थकीत कर्जाचे हप्ते पाडण्यात आले. हप्ते दरवर्षी भरून नवे पीककर्ज उचलण्याची संंधी शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, शासनाच्या या संधीचा लाभ न घेता शेतकऱ्यांनी रूपांतरित कर्जफेड योजनेअंतर्गत थकीत कर्जाच्या हप्त्यांचा भरणा न केल्याने पुढील काळात कर्जमुक्ती योजनेतंर्गत केवळ थकीत हप्ते ग्राह्य धरून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला तर उर्वरित मूळ कर्ज सदर हप्ते वगळता कायम ठेवण्यात आले. तथापि, कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ होऊनदेखील मूळ कर्जाची रक्कम माफ न करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदर कर्जमुक्ती नाकारल्याची माहिती आहे.
बॉक्स
१६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ हजार २३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील १६० शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने अद्यापही प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरले आहेत. नवीन पीककर्ज उचल करण्यास अडथळा येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.