निश्चित मेश्राम पालोरा (पवनी)दरवर्षीच्या नापिकी व कर्जाच्या वाढत्या भारामुळे पवनी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव व लागणारा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसण्यासारखी अल्प मदत मिळत आहे. पवनी तालुक्यात मागील पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात १० शेतकरी पात्र तर ११ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिक घेतले जाते. येथील शेतकरी सधन आहे. मागील पाच वर्षापासून वरून राजाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. पिकाची मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक, सोसायट्या, पतसंस्थांचे कर्ज घेतले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून घरी होते नव्हते कर्ज काढून पीक घेत आहेत. मात्र अपयश शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. पवनी तालुक्यात पाच वर्षात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात ११ लाभार्थी अपात्र तर १० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात प्रवीण कावळे कुर्झा, सूर्यभान पचारे रुयाळ, सखाराम कावळे मोहरी, गोविंदा वैरागडे चिचाळ, रविंद्र बावनकर आसगाव, बालकदास खोब्रागडे मांगली, चिंदू पायदलवार इटगाव, सदाराम नखाते चिचाळ, मनोहर मस्के कुर्झा, मुरलीधर इटगाव, मोहन समर्थ वलनी हे शेतकरी शासन नियमाप्रमाणे अपात्र ठरले आहेत. सोसायटी कर्जाचे नोटीस घरी पाठवित असल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न, शिक्षणाचा खर्च आदी चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहेत. दिवसेंदिवस खत, औषधीचे किमती वाढत आहेत. मात्र मालाला मिळणारा अल्प भावाने शेती करणे न परवडणारे झाले आहे. आज ना उद्या पीक हातात येईल म्हणून शेतकरी रात्रंदिवस राबत आहे.
पवनी तालुक्यात पाच वर्षांत २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: September 04, 2015 12:05 AM