पवनी : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरासागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शनिवारी दुपारी २ वाजता २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून २३५६.७८८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. जून महिन्यापासून या प्रकल्पात ४७२६.०८ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे. पाणी पातळी २४४.१३० मीटर असल्याने व पावसाचे शक्यता असल्याने या प्रकल्पाचे २१ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गाेंदिया जिल्ह्यातील कालीसरार धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे. या जलाशयाचा एक दरवाजा शुक्रवारी सकाळी ०.३० मीटर उघडण्यात आला हाेता. कालीसरार धरण हे बाघ नदीवर असून धरणातील विसर्गाचे पाणी पुजारीटाेला प्रकल्पात जाते. पुजारीटाेला प्रकल्पतून पाणी साेडल्यानंतर भंडारा शहराजवळील कारधा पुलावर पाणी येण्यास ३१ तासांचा कालावधी लागताे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाेसे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
गाेसे खुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:40 AM