लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात यावर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ४६ हजार ४३५ शेतकऱ्यांना २११ कोटी १३ लाख ७९ हजार १८१ रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. बँकेला यावर्षीच्या खरीप हंगामात २९० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागीलवर्षी २०१६-१७ मध्ये जिल्हा बँकेने खरीप हंगामात २७४ कोटी ९१ लाख रूपयांचे तर रबी हंगामात ६ कोटी २७ लाख रूपये असे एकूण २८१ कोटी १८ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले होते. बँकेने ३१ मार्च २०१७ पर्यंत २३३ कोटी ७८ लाख ११ हजार रूपयांची वसुली करण्यात आलेली आहे. मागीलवर्षी वाटप केलेल्या कर्जापैकी ८३ टक्के कर्जाची वसुली झाली आहे.कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने ३० जून २०१६ ही तारीख ग्राह्य ठरविली आहे. या तारखेला जिल्हा बँकेच्या १९,८७१ शेतकऱ्यांवर ११७.६४ कोटी रूपयांचे कर्ज थकित आहे. शेतकऱ्यांना प्राथमिकतेच्या आधारावर १० हजार रूपये कर्ज देण्याच्या निर्णयानुसार बँकेने १५ जूनला परिपत्रक काढले. संयुक्त निबंधकांनी मागेल त्याला कर्ज देण्याचे निर्देश दिले आहे. या कर्जासाठी कुणीही अर्ज केलेला नाही. शेतकरी जागृतीसाठी बँक आता शेतकरी मेळावे आयोजित करणार आहे. - संजय बरडे, महाव्यवस्थापक, जिल्हा सहकारी बँक, भंडारा
जिल्ह्यात ४६,४३५ शेतकऱ्यांना २११.१३ कोटींचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:23 AM