भंडारा : पूर्व विदर्भातील समृद्ध वनसंपदा असलेल्या भंडारा वन विभागात मार्च महिन्यात वणवा लागण्याच्या २२ घटना उघडकीस आल्या असून, वणव्याची ५४ हेक्टर जंगलाला झळ पोहोचली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने वन्य प्राणी जीवहानी टळली.
भंडारा वन विभागांतर्गत ९३१.२४ चौरस किलोमीटर जंगल आहे. तसेच नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन आहे. पानझड जंगल असल्याने उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना घडतात. १६ फेब्रुवारी ते १५ जून हा वणव्यांचा कालावधी असतो. या काळात जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागून जंगल नष्ट होण्याची भीती असते. वन्यजीवही होरपळून जातात. मार्च महिन्यात वणव्याच्या २२ घटना घडल्यात. यामध्ये ५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात जमिनीवरील पालापाचोळा आणि गवत जळाले. झाडांना आणि वन्य प्राण्यांना झळ पोहोचली नाही. वन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे वणवा वेळीच नियंत्रणात आला.
जंगलात आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई
भंडारा जिल्ह्यातील या जंगलातून अनेक गावांचे रस्ते आहेत. रस्त्याने जाताना पेटती विडी-सिगारेट फेकतो. तर जंगलाशेजारी असलेल्या शेतांची धुरे पेटविताना जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. मोहफूल संकलनासाठी झाडाखालची जागा साफ करण्याकरिता आग लावली जाते. त्यामुळे जंगलात वणवा लागतो. आता या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. जंगलात फायर वॉचरची नेमणूक करण्यात आली आहे. आगीची माहिती देण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. येवढेच नाही तर शासकीय वनात आग लावताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
वन विभागाच्यावतीने वणवा नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गावकरी, संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांची मदत घेतली जात आहे. गावागावांत जनजागृती करण्यात येत असून, आग लावणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे. नागरिकांनी जंगल वाचविण्यासाठी सहकार्य करावे.
-राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा.