तुमसर : दुर्गम व आदिवासीबहुल परिसरातील गोबरवाही येथे एका पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांची २६ पदे रिक्त आहेत. कोरोना संक्रमण काळात केवळ २३ पोलिसांनी परिश्रम करून शांतता व सुव्यवस्था सोबतच परिसरात नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. गृह विभागाने येथे रिक्त पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची यामुळे दमछाक होत आहे.
तुमसर तालुक्यात गोबरवाही परिसर हा सातपुडा पर्वत रांगात असून, गावे दुर्गम व जंगलव्याप्त आहेत. नक्षलग्रस्त बालाघाट जिल्हा व नागपूर जिल्ह्याच्या सीमा येथे भिडलेल्या आहेत. येथे मंजूर पदे ४९ असून, त्यापैकी २३ पोलीस सध्या कार्यरत आहेत. पोलिसांची २६ पदे रिक्त आहेत. यात पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे ४४ गावे येतात.
या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असून, त्यापैकी एका पोलीस अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. त्यात एका पोलीस उपनिरीक्षक पदाचा समावेश आहे. साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा, तसेच दोन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे संलग्न केले आहेत. काही पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाजात व्यस्त राहतात. भंडारा व तुमसर येथे त्यांना न्यायालयीन कामाकरिता जावे लागते. येथील दोन पोलीस वाहन चालक बनले आहेत. तसेच फिरते पथक व तपास कार्याकरिता पोलिसांना दरदिवशी जावे लागते.
कोरोना संक्रमण काळात पोलिसांची जबाबदारी वाढली होती. गाव परिसरात शांतता व सुव्यवस्था सोबतच नागरिकांवर नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागली. केवळ २३ पोलिसांच्या भरवशावर त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. यामुळे येथील पोलिसांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
बॉक्स
पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत नाही
गोबरवाही पोलीस ठाणे सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. येथे पोलीस ठाण्याची स्वतंत्र इमारत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सुंदरटोला मार्गावर तीन एकर सरकारी जमीन आरक्षित केली आहे. परंतु बांधकामाला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सदनिकांचा समावेश आहे.
गोबरवाही पोलीस ठाण्याच्या सीमा मध्यप्रदेशाशी भिडलेल्या आहेत. त्यामुळे बावनथडी पुलावर पोलीस नियंत्रण कक्ष तसेच लेंडेझरी येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची गरज आहे.