भुयार-पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे उपविभागीय अधिकारी, भंडारा व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निर्देशानुसार सिंदपुरी येथील सामाजिक न्याय मुलीचे वसतिगृहात १ एप्रिल रोजी १५० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले होते. सदर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली असून, गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी ७० ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी दिली. सदर कोविड सेंटरवर उपचारासाठी भंडारा जिल्ह्यातीलच नाही तर भिवापुर, उमरेड व ब्रह्मपुरी तालुक्यातील ही कोविड रुग्णही येथे उपचारासाठी येत असतात. आजपर्यंत या केंद्रावर २७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, २३१ रुग्ण बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६ गंभीर रुग्णांवर कोविड केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कोविड उपचारादरम्यान मृत पावलेल्या व्यक्तीवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी खापरी येथे स्मशानभूमी उभारली आहे. ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग यांच्यामार्फत उपचार महसूल, पोलीस व शिक्षण विभाग यांची नियुक्ती केंद्रावर केली आहे. सिंदपुरी कोविड केंद्रात कोणत्याही सुविधेची कमतरता राहू नये तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना पूर्ण उपचार मिळावेत यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयाची तरतूद केली असून, तालुक्यातील कोरोना परिस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत सूचना देण्यात येत असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.
सिंदपुरी कोविड सेंटरवर २३१ कोविड रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:38 AM