लाखांदूर : गत खरीप हंगामात पूर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड यासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानीची दखल घेत शासनाने तालुक्यातील आपादग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. मात्र सदर निधीचा लाभ देतांना शेतक-यांच्या बँक खात्यातील विविध सदोष कारणांनी तालुक्यातील २३३० शेतकरी सुमारे २ कोटी रुपयांच्या मदतीपासून वंचित ठरल्याची खळबळजनक माहिती आहे. सदर प्रकरणी शासन मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध होण्यासाठी तहसील प्रशासनांतर्गत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार गतवर्षीच्या खरिपात तालुक्यात अतिवृष्टी, कीड व तब्बल तीनदा पूरपरिस्थिती निर्मा. होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसान तालुक्यातील विरली(बुज), भागडी व लाखांदूर आदी महसूल मंडळांतर्गत झाले होते. सदरप्रकरणी तालुका महसूल प्रशासन व कृषी विभागांतर्गत नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामा करून शासन मदतीसाठी क्षतिग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, सदर याद्यांतर्गत शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक देखील घेण्यात येऊन जवळपास ९ कोटी रुपये पीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, तालुक्यातील २ हजार ३३० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक सदोष आढळून येतानाच आयएफसी कोड देखील सदोष व बंद बँक खाते असल्याने अनेक पीडित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा न झाल्याची ओरड होती.
सदरप्रकरणी येथील तहसील प्रशासनाने दखल घेत सदोष बँक खात्यांमुळे मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत उपलब्ध होण्यासाठी येथील तहसील प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असून लवकरच मदतीपासून वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.