भंडारा : बुद्ध पौर्णिमेनिमित्त वनविभागांतर्गत २२ व २३ मे रोजी २४ तासांसाठी पाणवठ्यावरील निसर्गानुभव-२०२४ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भंडारा जिल्ह्यातील २४६ निसर्गप्रेमींनी निसर्गानुभवाचा आस्वाद घेतला. ८२ पाणवठ्यांवरील मचाणींवरून ३,४२९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.
पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या पाणवठ्यांवरील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेबाबत अनेक मतप्रवाह आहेत. सदरची पद्धत, त्याची अंमलबजावणीचे स्वरुप शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्त ठरत नसल्याने शास्त्रीयदृष्ट्या पाणस्थळावरील प्रगणना करण्याचा आग्रह वैज्ञानिक संस्थांकडून करण्यात येत नाही. परंतु, पारंपरिक पद्धतीत व वनविभागाबाहेरील व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग लक्षात घेता सदरची पारंपरिक पद्धती सुरू ठेवण्याचा आग्रह होत असतो.
जनसामान्यांमध्ये वन व वन्यप्राण्यांबाबत कुतूहल व आकर्षण नेहमी टिकून राहते. या अनुषंगाने भंडारा वनविभागाने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणस्थळावरील वन्यप्राण्यांचा अंदाज हा निसर्गानुभव म्हणून कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले होते. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), यांच्यामार्फत विशेष सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. भंडारा वनविभागात एकूण ८२ पाणवठ्यांवर मचाणींची व्यवस्था करून निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात आलेला होता.
यावेळी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी, वन्यजीवप्रेमींनी व वन्यजीवांबाबत विविध काम करणाऱ्या संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी प्रत्येक मचाणीवर वनविभागाबाहेरील एका व्यक्तीस परवानगी देण्यात आलेली होती. प्रत्येक मचाणीवर ०२ वनकर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. एकूण २४६ व्यक्तींनी निसर्गानुभव कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी वन्यजीवप्रेमींना ३,४२९ वन्यप्राणी दिसून आले. यामध्ये १२ वाघ, १० बिबट, २३ अस्वले, २७ रानकुत्रे, ४० रानगवे व इतर तृणभक्षी वन्यप्राणी यांचा समावेश आहे.
काेका अभयारण्यात ३४५ वन्यजीवांचे दर्शन
कोका वन्यजीव अभयारण्यात यंदाची बुद्ध पौर्णिमेची प्रकाशमय रात्र निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. गणना करण्यासाठी १६ मचाणींची व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गानुभवात ३४ प्रगणक व वनकर्मचारी सहभागी झाले होते. ३४५ वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. कोका वन्यजीव अभयारण्य नेहमीच वन्यप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. यावर्षीही ते आकर्षण कायम राहिले. प्रगणेत बिबट ४, अस्वल १९, गवा १४६, रानडुक्कर ६२, रानकुत्रे १०, चितळ ५०, निलगाय १२, सांबर १४, मोर ३७, रानकोंबडी २, वानर ९, सायाळ ६, मसन्याऊद ६ आदी वन्यजीवांचे दर्शन घडले. कोका अभयारण्य वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृद्ध असल्याचेही समोर आल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
भंडारा वनक्षेत्र वन्यजीवांनी समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, रानगवे, मोर व अन्य वन्यजीवांची वैविधता दिसून आल्याने निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला.- राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा.