देव्हाडा खुर्द येथील प्रकरण : अर्जदाराला दिलासालोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : राज्य माहिती आयुक्त वसंत द. पाटील नागपूर यांनी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा जि.प. पूर्व माध्यमिक शाळा देव्हाडा खुर्दचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विनायक सोमा कोसरे यांनी अपिलार्थी जयराम शेंडे देव्हाडा खुर्द यांना जाणून बुजून माहिती देण्यास नाकारल्याचे सिद्ध केले. मुख्याध्यापकांनी आयोगासमोर दिशाभूल करणारा खुलासा सादर केल्याने त्यांचा खुलासा अमान्य केला. या प्रकरणी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक कोसरे यांनी जाणीवपूर्वक भंग केलेला असून त्यांचेवर २५ हजारांची शास्ती कायम करीत असल्याचे आदेश पारीत केले. या निकालामुळे अपिलार्थीला दिलासा मिळाला असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच माहिती नाकारण्यासाठी दणका असल्याचे बोलले जाते.मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथील जयराम शेंडे हे जि.प. पूर्व माध्यमिक शाळा देव्हाडा खुर्द येथे रोजंदारी परिचर म्हणून कार्यरत होते. सदर कामावर ते १० वर्ष कार्यरत होते. शिक्षकांनी सांगितलेले सर्व कामे ते करीत होते. त्यांच्या कामाची वेळ सकाळी ८ ते ५ वाजता पर्यंतची होती. परंतु शाळेचे मुख्याध्यापक विनायक कोसरे यांनी कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता तोंडी सूचना देवून कामावरून बंद केले. संबंधित माहितीची कागदपत्रे गहाळ झाल्याचे कारण देत माहिती देण्यास फारच उशीर केला. आवक-जावक तसेच रजिस्टरची पाने जीर्ण झाले असल्याचे अर्जदार जयराम शेंडे यांना कळविले. तसेच माहिती देण्यास पुन्हा टाळाटाळ केली. त्यामुळे अर्जदाराला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियमानुसार द्वितीय अपील राज्य माहिती आयुक्त नागपूर यांचेकडे दाखल केले. राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील नागपूर यांना तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक विनायक कोसरे यांनी जावक रजिस्टरला पान उपलब्ध नसल्यामुळे माहिती पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. परंतु तीच माहिती वर्तमान जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थीस पुरविली. त्यामुळे कोसरे यांनी जाणीवपूर्वक अपिलार्थीस माहिती देण्यास नाकारल्याचे सिद्ध झाले होते. तसेच मुख्याध्यापकांनी आयोगासमोर दिशाभूल करणारा खुलासा सादर केलेला असून त्यांचा खुलासाही अमान्य करण्यात आला.प्रस्तूत प्रकरणी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक विनायक कोसरे यांनी जाणीवपूर्वक कलम ७(१) भंग केलेला असून त्यांचेवर २५ हजारांची शास्ती कायम करीत असल्याचे आदेश पारीत केले. सदर शास्तीची रक्कम तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक कोसरे यांनी लेखाशीर्ष, इतर प्रशासकीय सेवा, इतर सेवा, इतर जमा रक्कम, माहितीचा अधिकार नियमितपणे शासकीय कोषागारात रक्कमेचा भरणा करतील याची प्रथम अपिलीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. शास्ती संदर्भात या प्रकरणाचा आयोगाकडील वार्षिक अहवालामध्ये समावेश होत आहे.
माहिती नाकारल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला २५ हजारांचा दंड
By admin | Published: June 16, 2017 12:21 AM