लाखांदूर : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३५ प्रभागातील ९९ सदस्यांसाठी तब्बल २५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील काही अर्ज अवैध तर काही उमेदवारी मागे घेण्याची शक्यता असल्याने बहुतांश ग्रामपंचायती अविरोध होण्याची शक्यता आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यानुसार ३० डिसेंबर या नामांकनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बेलाटी ३२, गुंजेपार-किन्ही २८, चिचाळ-कोदामढी १९, पारडी १५, मुर्झा-२६, कोच्छी-दांड़ेगाव २१, कन्हाळगाव-चिचगाव २५, मान्देड-सावरगाव १९, पुयार १५, चिचोली-अंतरगाव २० तर सोनी -इंदोरा येथील १३ सदस्य व ५ प्रभागासाठी ३२ असे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
३१ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल उमेदवारी अर्जाची छाननी व ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तहसीलदार निवृत्ती उइके यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किशोर पटले, प्रमोद वानखेडे, सुनील ठवरे, एस.एन. गडमडे तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद सांगोळे, विनोद पंधरे, राजू मेश्राम व आर.जे. हेमने आदी काम पाहत आहेत.