सिल्ली येथे धरपकड : पुरकाबोडी जंगलात सोडले भंडारा : तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यांनी पकडून जंगलात सोडण्याचा प्रकार महिनाभरापासून सुरु आहे. या धरपकड कार्यक्रमात आज २६ माकडांना पकडून पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. सिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वास्तव्य करतात. जंगल परिसरालगत असलेल्या सिल्ली येथे माकडांचा नेहमीच उच्छाद असतो. या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी वनविभागाकडे लावून धरली होती. मात्र मर्कटलिलांपुढे वनविभागही हतबल झाले होते. दरम्यान माकडांवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी वनविभागाने काही ग्रामस्थांना नागझिरा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते. मात्र माकडांवर नियंत्रण मिळविण्यात त्याला यश आले नाही. दरम्यान सिल्लीचे ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांच्या संपर्कातून हैद्राबाद येथील हैदर खान यांना माकडांना पकडण्याकरिता बोलाविण्यात आले. सिल्ली येथे कौलारू व मातीची घरे आहेत. या घरांवर उड्या मारून माकडांच्या जत्थ्याने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले. कित्येक घरांचे कौले फोडली. त्यामुळे मागील महिनाभरापासून हैदरखान यांच्या माध्यमातून सिल्लीत माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. हैदर खान यांच्याकडे माकडांना ताब्यात घेण्यासाठी पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांमध्ये माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. आज सकाळी एकनाथ साखरवाडे यांच्या शेतात पिंजरे लावून २६ माकडांना पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देवून वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला व जेरबंद करण्यात आलेल्या सर्व माकडांना पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)अशी पकडली माकडेरात्रीच्या वेळेस माकडांचा कळप साखरवाडे यांच्या शेतातील झाडावर झोपी गेले. त्यांना सकाळी उठल्यावर भूक लागते, ही बाब हैदर खान यांना माहिती होती. त्याप्रमाणे त्यांनी झाडाखाली पिंजरे लावले. या पिंजऱ्याला दोन कप्पे आहेत. त्यात सुमारे ४० ते ५० किलो भाजीपाला ठेवण्यात आला. तो खाण्यासाठी माकडांचा कळप त्यात शिरल्यानंतर जेरबंद करण्यात आले. अशा प्रकारे मागील महिनाभरापासून १२५ ते १५० माडांना जेरबंद करण्यात आले. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे वनविभाग व हैदर खानच्या मदतीने माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. अनेक घरांची व कौलांची तोडफोड झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. आता ग्रामस्थ काही प्रमाणात का होईना समाधानी झाले आहे. - दुलीचंद देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत, सिल्ली
उच्छाद मांडणारे २६ माकड जेरबंद
By admin | Published: January 22, 2017 12:30 AM