संजय साठवणे
भंडारा : धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी धानाचा चुरणा केला नाही. धानाचे पुंजणे शेतातच होती. अंधाराचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळावर पोलिसांना एक चिट्ठी व बॅचेस सापडले असून दोषीविरुद्ध कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. घटना उघडकीला आल्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाल्याची फक्त अधिकृत घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतातच होते. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने ३३ एकर शेतीतील धानाच्या अठरा पुंजण्याला आग लावून जाळून टाकले.
एवढ्या मोठ्या क्षेत्रातील धानाच्या पुंजण्याला एकाचवेळी आग लावण्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. आग लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले होते. मंडळ अधिकारी हलमारे यांनी जळालेल्या धान्याच्या पुंजण्याचे पंचनामे केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करा
अज्ञात इसमाने धान पुंजण्याला आग लावीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घटनास्थळी आढळली चिठ्ठी
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी व समारंभात वापरले जाणारे बॅचेस सापडले आहेत. या चिठ्ठीवर धानाचे पुंजणे जाळले आहे, असे नमून केले आहे. या चिठ्ठीचा या बॅचेसशी काही तारतम्य आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.
अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी धानाच्या पुंजण्याला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस ३३ एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.