गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम भरेगाव येथील रॉयल्टी काढून मासुलकसा-पीतांबरटोला येथील गट क्रमांक ६८ मधील फूलसिंग रतनू पंधरे यांच्या आराजी १.२१ हे.आर. खासगी जमिनीतून ५८ ब्रास मुरमाचे उत्खनन करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या कडेला पसरविला आहे. या संदर्भात अवैध उत्खनन करणाऱ्या दोघांवर तीन लाख ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अवैध गौण खनिज मुरूम खोदकाम केल्याचा प्रस्ताव २४ मे रोजी तहसीलदार विजय बोरुडे यांना पाठविण्यात आला होता.
ग्राम पुराडा येथील विनोद भेंडारकर व ग्राम बाह्मणी येथील महेश डुंबरे यांनी भरेगाव येथील गटाची रॉयल्टी परवाना काढून मासुलकसा-पीतांबरटोला येथील गट क्रमांक ६८ मधील आराजी १.२१ हे.आर. येथील ५८ ब्रास मुरूम जेसीबी क्रमांक एमएच २९- एडी ८१७१ च्या साहाय्याने खोदून काढला. ज्या ठिकाणी खोदकाम केले त्या खड्ड्याची लांबी २० मीटर व रुंदी १५ मीटर, खोली २ मीटर असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७) अन्वये, बाजारभाव मूल्याच्या पाचपट दंडात्मक कारवाई करण्यात आली. भेंडारकर यांनी ११० ब्रास मुरूम अवैधरीत्या उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे स्वामित्वधन ४०० रुपये बाजारभाव मूल्याच्या पाचपट दंड दोन लाख २० हजार रुपये व महेश डुंबरे याला ५८ ब्रास मुरूम हे अवैधरीत्या उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे मुरमाचे स्वामित्वधन ४०० रुपये बाजारभाव मूल्याच्या पाचपट दंड एक लाख १६ हजार रुपये दंडाची रक्कम शासनजमा करण्याचे आदेश तहसीलदार बोरुडे यांनी दिले आहेत.
भरेगावची रॉयल्टी झाली रद्द
भरेगावची रॉयल्टी दिली असून, पीतांबरटोला येथून मुरूम खोदून नेणाऱ्यांनी शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर दंड आकारून त्यांची भरेगाव येथील रॉयल्टी तहसीलदारांनी रद्द केली आहे. १८ मे रोजी दिलेला गौण खनिज आदेशाचा परवाना रद्द करण्याचे आदेश २४ मे रोजी दिले आहेत.
दोघांवर फौजदारी गुन्हा
पुराडा येथील विनोद भेंडारकर व बाह्मणी येथील महेश डुंबरे यांच्याविरुद्ध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी कुसेंद्र भागवत कोरे (५५) यांच्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस नायक परसमोडे करीत आहेत.