लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. १ लाख ९६ हजार ९८१ विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. यात विद्यार्थिनींची संख्याही मोठी आहे; मात्र शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता शाळांमध्ये शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षक नसल्याने मुलींचे समुपदेशन कसे होणार, त्यांनी अडचण सांगायची तर कोणाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असते. जिल्ह्यातील जि. प. शाळेच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक गुरुजी ज्ञानदानाचे काम करीत आहेत. जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. यात सुमारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दोन लाख विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
विद्यार्थिनींची संख्याही ९५ हजार ६९० आहे. दरम्यान, शाळांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. शाळेत शिकत असताना शिक्षणाबरोबरच मुलींना विविध अडचणींचा सामोरे जावे लागते. मुळातच मुली लाजाळू असल्याने आपल्या अडचणी स्पष्ट सांगू शकत नाहीत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी महिला शिक्षक शाळेवर असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ३३८ शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला अन् मुलींचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
बहुतांश शाळांत महिला शिक्षकच नाहीत जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. मात्र, यात बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
महिला शिक्षक केवळ ३३८ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता १२९७ शाळांमध्ये केवळ ३३८ महिला शिक्षक कार्यरत आहेत. यातच अनेक शाळांवर एकापेक्षा अधिक महिला शिक्षक कार्यरत असल्याने इतर शाळांमध्ये मात्र मुलींना महिला शिक्षकांची प्रतीक्षाच आहे.
शाळामध्ये दोन लाख विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळेच्या माध्यमातून १ ली ते १२ वी पर्यंत १ लाख १ हजार २९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९५ हजार ६९० विद्यार्थिनी शाळेतून धडे गिरवत आहेत.
कसे होणार मुलींचे समुपदेशन?
- ग्रामीण भागात जिपच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे १२९७ शाळा आहेत. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
- मात्र, शाळांतील मुलींच्या अडचणी समजून घेण्यासाठीची जबाबदारी महिला शिक्षकांनी घेणे आता गरजेचे झाले आहे. मात्र, शिक्षकांची संख्या पाहता महिला शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे.
उपाययोजना
- बदलापूर येथील घटनेनंतर सर्व शाळांत मुलीच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
- तशा सूचनाही सर्व शाळांना दिल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.